Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Monday, 31 March 2014

सत्यशोधक - ६

काळाच्या शक्तिच मापन

काळाच्या प्रवाहाच सोदाहरण स्पष्टीकरण दिल्यानंतर काळाच्या शक्तिच मापन हा प्रश्न गौण राहणार नाही. काळ हा अनादी स्वयं पूर्ण असल्यामुळेच त्याच्या या गुणधर्मातच अखिल ब्रह्मांडाच्या व्युत्पत्तीचे सार आहे. ते असे कि काळ प्रवाही होता आणि आहे म्हणूनच विश्वाची व्युत्पत्ती झाली व भविष्यातील व्युत्पत्तीचे कारणसुद्धा काळच राहील.

जर हा काळ प्रवाही नसता तर अखिल ब्रह्मांडाची व्युत्पत्ती झालीच नसती, कारण काळ जर आपण स्थिर कल्पिला तर त्याच्यात चळवळ कशी होणार? चळवळी मुळेच कार्य होते व कार्यातून कारण आणि शेवटी आश्चर्यकारक इतिहास निर्माण होतो. सांगायचा मुद्दा हा की काळाच्या प्रवाहीपणाच्या गुणधर्मामुळेच चळवळ निर्माण झाली आणि त्या चळवळीचा परिणाम म्हणजे ब्रह्मांडाची व्युत्पत्ती.

 थोडक्यात सांगायच तर काळ हा शक्तीच्या परेय आहे. तो काल होता, आजही आहे, उद्याही राहील आणि शुन्यातही त्याच अस्तित्व कायम राहील. टिक... टिक.... टिक....

Sunday, 30 March 2014

सत्यशोधक - ५

काळाच्या अमर्यादित शक्तीचा दाता कोण ?

मागील प्रकरणाच्या स्पष्टीकरणानंतर हा प्रश्न तसा व्यर्थ आहे. काळाच्या शक्तीला कोणीही दाता नाही उलट काळातूनच शक्ती प्रस्तुत होते व त्यामुळेच काळाच्या शक्तीचा कोणी दाता नसून काळ हाच शक्तीचा दाता आहे. चार प्रकरणांच्या सम्पुष्टीनंतर  वाचकांच्या मनात एक प्रश्न आला असेल कि या लेखमालेत काळालाच कोणत्याही व्युत्पत्तीचा पाया का मनाला आहे?

तर उपरोक्त शंकेचे समाधान असे कि, तुम्ही अशी कल्पना करा कि अखिल ब्रह्मांडात काहीही नाही म्हणजे असतील नसतील तेव्हढे ग्रह, तारे, सूर्य, चंन्द्र व इतर अनेक लहान मोठे घटक एव्हढेच नव्हे तर ब्रम्हांडाच अस्तित्वच काही काळाकरीता बाजूला ठेवा तुम्हाला अस्वस्थ करणारी पोकळी अथवा पोकळी हि संज्ञाहि जिथे फिकी पडेल असे जे काही जाणवत आहे ह्या अवस्थेतच आपण काळाच अस्तित्व समजू शकतो. पूर्वी सांगितल्याप्रमाणे काळ हा प्रवाही आहे.

आता हि प्रवाहीपणाची गोष्ट नीट स्मरून त्या अवस्थेतच विचार करा कि आपण ज्या अवस्थेत आहोत तेथेही काळ प्रवाही आहे तो थांबलेला नाही कारण तो प्रवाही आहे म्हणूनच पुढे अखिल ब्रम्हांड निर्माण होणार आहे व त्या ब्राम्हंडात अगणित तारे, तारका, ग्रह, सुर्य, चंद्र व त्या अनुषंगाने परिस्तिथी व पोकळी यांच्या संयोगाने निर्माण होणारया हवा, ध्वनी, प्रकाश इत्यादी कार्यकारणिक गोष्टी निर्माण होणार आहेत.

वरील अवस्थेच्या अनुभवानंतर एक गोष्ट लक्षात आली असेल कि जेव्हा आपण काही नाहीची कल्पना करतो तेव्हासुद्धा काळ प्रवाही असतो. त्या शिवाय का आपण अस म्हणू शकतो कि मी हा अनुभव घेतला, कारण अनुभव घेते वेळीसुद्धा जो काही तुमचा काळ निघून जातो तोच काळाची साक्ष पटवून देण्यास समर्थ आहे. म्हणूनच काळ हा सदैव व निरंतर प्रवाही आहे व त्याला आदी, मध्य व अंत नाही आणि त्यामुळेच काळ हा समस्त  सृष्टीचा आद्यकारण आहे .

Saturday, 29 March 2014

सत्यशोधक - ४

जो स्वतः  स्वयंपूर्ण आहे ज्याला कोणत्याही प्रकारच बंधन नाही व ज्याच्या प्रत्येक हालचालीत सामर्थ्य आहे व ज्याच्यामुळे शक्तीला शक्ती हे संबोधन आहे तो हा काळ. आणि काळाचे सामर्थ्य हेच की काळ हाच शक्तीचा कारक आहे.

याच सोदाहरण स्पष्टीकरण अस की, आपण निसर्गाच्या सानिध्यात असता जेव्हा  मंद सुगंधीत हवेचा झोका जाणवतो तेव्हा त्या सुगंधाच रहस्य आपण तत्काळ ओळखतो व ते कारण म्हणजे फूल. कारण  फुलामुळे सुगंध आहे सुगंधामुळे सुगंध नाही.

बोध असा की फुलातच सुगंध प्रसवायच सामर्थ्य आहे, तद्वतच काळातच शक्ती प्रसवण्याचे सामर्थ्य आहे कारण शक्तीमुळे काळ नव्हे तर काळामुळे शक्ती आहे.

Friday, 28 March 2014

सत्यशोधक - ३

काळाला नियमाचे बंधन का नाही?

काळ हा जर नियामातीत असेल तर त्याला प्रवाहीपणाचा नियम का लागू होतो? असा प्रश्न बहुतेकांना जरूर पडला असेल. तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये नाकाद्वारे श्वास घेऊन तो तोंडा वाटे सोडतो. हि क्रिया नियम नसून ती जगण्यासाठी आवश्यक अशी वृत्ती अथवा गरज आहे व गरज हि कधी नियमांनी बाध्य होत नाही.

वरील उदाहरणाद्वारे आपल्याला समजलेच असेल की काळाचा प्रवाहीपण हे नियम बद्ध नसून ती एक स्वाभाविक वृत्ती आहे.

Thursday, 27 March 2014

सत्यशोधक - २

नियम 

काळाचा नियम सांगण्याआधी नियमाचा इष्ट अर्थ सांगणे योग्य ठरेल ;
" मोठ्या अथवा लहान स्तरावर भौतिक अथवा आदिभौतिक रहाटगाडे सुरळीत चालण्यासाठी, त्या स्तरावरील जीवांसाठी जी बंधने घातली जातात अथवा असतात त्याला नियम असे म्हणतात. "

वरील नियमाची व्याख्या पाहता काळाला  नियम लागू होत नाही हे स्पष्ट होते. कारण या ठिकाणी आपण काळ हि वस्तु (भौतिक) गृहीत न धरता एक विषय (*आस्तिक्य) म्हणून पहात आहोत. आणि या आधी स्पष्ट केल्याप्रमाणे काळ हा भौतिक व आदिभौतिक विश्वाचा कारक आहे व त्यामुळे नियम व बंधनातीत आहे.
खरे पाहता नियम हा *मायेचा अविष्कार आहे.





*आस्तिक्य : भौतिक कक्षेत न येणारी पण अस्तित्वात असणारी किंवा जाणवणारी 
* माया :        गृहीतकांवर आधारित गोष्ट (अध्यात्मिक अर्थ नाही) किंवा जी गोष्ट मुळात नसते पण मानतात. (माया *सापेक्ष असते)
 *सापेक्ष :      व्यक्ती परत्वे बदलणारे एकाच विषयाचे आयाम

 

Wednesday, 26 March 2014

सत्यशोधक - १

प्रस्तावना 

सत्य हे सदैव अविचल आहे. सत्य हे काळाचेच एक अविचल आणि प्रवाही स्वरूप आहे. होय, काळ... काळ हाच ईश्वर आहे, समस्त ब्रम्हांडाचा नियंता आहे. संपूर्ण ब्रम्हांडात जेव्हा काही अस्तित्वात नव्हते एव्हढेच नव्हे तर स्वयं ब्रम्हांड सुद्धा अस्तित्वात नव्हते तेव्हासुद्धा हा काळ अस्तित्वातच होता. आणि तो नुसता अस्तित्वात नव्हता तर तो प्रवाही होता.

काळाच्या प्रवाहामुळे ब्रम्हांड निर्माण झाले, ग्रह निर्माण झाले, अगणित तारे, सुर्य, चंद्र, त्या ग्रहांवर अस्तित्वात असलेले अगणित लहान-मोठे-सुक्ष्म जीव निर्माण झाले.चक्रावून सोडणार अमर्यादित कल्पनातीत विश्वसुद्धा काळाचच एक अंग आहे.

काळ हि गोष्ट व्याखेत कैद करण्याइतपत जरी सोपी नसली तरी थोडक्यात सापेक्ष दृष्टीकोनातून काळाची व्याख्या अशी होऊ शकते ;
" जो अनादी आहे व साहजिकच अनादी असल्यामुळेच जो अनंत आहे व जो प्रवाही आहे तसेच नियम व बंधनापलीकडील असून जगत्कारण आहे तो काळ होय "

Tuesday, 25 March 2014

कालाय तस्मै नमः

 दिनांक २३ जून २००७, वार शनिवार. या दिवशी मी काळ या विषयावर तात्त्विक आणि चिंतनात्मक विवेचन लिहायला सुरुवात केली, पण ते विवेचन पूर्णतः वैयक्तिक व माझ्या बुद्धीच्या मर्यादेत तसेच वाचन, पूर्व निरीक्षण आणि अनुभव या सर्वांच ते एक संचित होत.


उद्यापासून या ब्लॉगवर ते 'सत्यशोधक' या मथळ्याखाली  क्रमवार प्रसिद्धीस येईल. या लेखमालेला चिंतनात्मक स्फुट असेही म्हणू शकता. या आधीच्या विचार आणि कृती यावर आधारीत लेख मालेनंतर हा माझा दुसरा प्रयत्न. आशा आहे या आधीच्या लेखमाले प्रमाणे याच स्वागत होईल.

बाकी काळच प्रत्येक प्रश्नाच उत्तर देतो आणि देईल फक्त आपल्या हृदय आणि बुद्धीची कवाडे सतत उघडी ठेवा. तोपर्यंत, कालाय तस्मै नमः.....