Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Friday, 20 February 2015

लाइफ इन के पी ओ इंडस्ट्रीची ओझरती झलक खास तुमच्यासाठी...

 गर्भांतरीचे अनुभव आणि परिवर्तनाचे त्रिकालबाधित वास्तव



अस म्हणतात कि मुल आईच्या गर्भात असल्यापासुनच  त्याच्यावर संस्कार होत असतात, एका अजाण अजन्मा बीजावर जर  अप्रत्यक्षरित्या संस्कार होत असतील तर ती निसर्गाची किमयाच  म्हणायला हवी .
बीजाच - रोपट्यात, रोपट्याच- कळीत, कळीच- फुलात आणि शेवटी फुलाच कोमेजण हे चक्र सर्व सजीवांना समान आहे. पण या चक्रात अनुभवाची कित्येक वलय असतात आणि तीच प्रत्येकाची घडण वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या मार्गाने करत असतात. आजपर्यंत मी असंख्य अनुभव घेतले आणि भविष्यातही मला येतील. इथे मी मांडलेले अनुभव म्हणजे अगदी एक लहानसा हिस्सा आहे पण तो हि कुठेतरी बदल आणि प्रगल्भतेची जाणीव करून देतो.

कंपनीतीतील एक वर्षाचा लहानसा कालावधीही असाच गर्भांतरीच्या अनुभवासारखा होता. अनुभवला खरा पण शब्दांच्या आवाक्यात येत नाही. जेव्हा केव्हा तुम्ही तुमच स्वप्न साकार करता तेव्हाच नव्या स्वप्नांची बीजेही पेरली जातात आणि तीच पेरलेली बीज जेव्हा फोफावतात तेव्हा प्रत्येक वेळी बाहेर पडण जिकिरीच होऊन जात आणि त्यातूनच अपेक्षाभंग होतो आणि आपण स्वतःला दुर्भागी समजतो… काय गंमत आहे स्वतः च्या आत्ममग्न स्थितीत आपण स्वप्नात गुंग होऊन जातो आणि आपल्याला बाहेरच्या जगाचा विसर पडतो आणि जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा बाहेरच जग आपल्याला विसरलेल असत.

नोकरीला लागण माझ स्वप्न होत आणि ते पूर्ण झाल्यानंतरही मी जी स्वप्नांची इतर बीजे तिथे रोवली ती काही पूर्णत्वास गेली अस नाही. मी त्या नव्या स्वप्नांच्या पूर्ततेतच एव्हढा गुंतलो होतो कि पूर्ण झालेल्या स्वप्नांचा आस्वाद घेणच काहीसा विसरलो. गर्भातून बाहेर पडण्यासाठी धडपडणार मुल जेव्हा लहानपण ते म्हातारपण या दिर्घ टप्प्यातही अनेक वेळा धरपडत तेव्हा त्याच बीज जस गर्भातच सामावलेल असत, तसच इथे विस्तृत केलेले अनुभव जणू माझ्यासाठी गर्भांतारीचे अनुभव  आहेत.

'Change is the only thing which is permanent'

किती खरय! अगदी खरयाहून खर … बदल हीच एक शाश्वत गोष्ट आहे. बदल म्हटल्यावर तोंड वेंगाडणारा मी, माझ्यातच आजपर्यंत किती बदल झाला हे जेव्हा पहातो तेव्हा तो स्वीकारण्याऐवजी एक त्रयस्थ विचारसरणी डोक्यात येते, मी कुठे बदललोय? मी तर आहे तसाच आहे. बहुतांश हे प्रत्येकाच उत्तर असत, कदाचित माणसाला बदलाचा इतका तिटकारा असतो कि तो जाणवूनही स्वीकारण्याची मानसिक तयारी त्याची नसते.

कंपनीतल्या शेवटच्या दिवशी जेव्हा बसने मी घरी येत होतो तेव्हा असेच डोक्यामध्ये संसारातल्या परिवर्तनासंबंधीचे विचार चाललेले, बहुदा हे विसंगत वाटेल पण कंपनी सोडल्याच जे  दुःख किंवा जी भावनिक हुरहुर होती तिच्यावर ते मलमपट्टीच काम करत होत, आणि असही माणसाला दुःखाच्या वेळीच तत्वज्ञानाचा  खूप आधार वाटतो. बस प्रवास जेमतेम फक्त १५ ते २० मिनिटांचा होता पण या काळात विचारांचा जो काही उहापोह झाला तो तीन तासांच्या  प्रवचनासारखा होता.

माझ्या बाबतीत सांगायच झाल तर परिवर्तन कुठे नाही झाल? नोकरी लागण्यापूर्वीचा मी आणि नोकरी लागल्यानंतरचा मी, नोकरी मिळाल्याचा खुप आनंद वाटणारा मी ते तीच नोकरी सोडण्याचा विचार करणारा मी आणि अशी किती म्हणून परिवर्तनाची आवर्तन माझ्या बाबतीत घडली. इथे परिवर्तन चांगल कि वाईट हा प्रश्नच राहत नाही, तुमची इच्छा असो वा नसो परिवर्तन हे घडतच असत, त्याला कारणीभूत घटक कधी आसपासची परिस्तिथी असते तर कधी तुमचे स्वतःचे निर्णय असतात तर कधी दुसऱयांचे निर्णय निर्णायक ठरत असतात. कारण काहीही असल तरी परिवर्तन हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.

आयुष्य हि गती आहे तर परिवर्तन दिशादर्शक आहे जी गतिमान आयुष्याला कोणतीतरी दिशा निश्चित करून त्या दिशेने अग्रेसर करते व आयुष्याला अर्थही प्राप्त करून देते. खचितच हे परिवर्तन कदाचित माझ्या आयुष्याला योग्य दिशा देईल. परिवर्तनाच त्रिकालबाधित वास्तव हेच असाव.

                                                                                                                     -  विशाल बर्गे 
                                                                                                             (लाइफ इन के पी ओ इंडस्ट्री )    
                                                                                                                   लेखक - विशाल बर्गे
                                                                                                          प्रदर्शन तारीख - २१ मार्च २०१५



Saturday, 14 February 2015

काटेरी गुलाब


काटेरी गुलाब

फुला सारखा सुंदर चेहरा 
आणि दगडाच काळीज
चेहऱयावरती निरलस गोडवा 
आणि हृदयात विखार 
भुललो तिच्या सौंदर्यावर 
आणि झुलत राहिलो तिच्या तालावर 
तिच्या शिवाय रहावत नव्हत 
जणु नशाच ती झिंगच चढायची 
एक दिवस सोडून गेली झटक्यानिशी 
आश्चर्य करायला हि फुरसत नव्हती 
मी म्हणालो,
खर आहे गुलाबाला नेहमी काटेच असतात
ती म्हणाली,
नाही! तुझ लक्ष केवळ गुलाबावर होत 
पण काटयावरच भान तुझ उडाल होत….

- विशाल बळवंत बर्गे


(शब्दस्नेह प्रकाशन प्रस्तुत, विशाल बर्गे लिखित Life In KPO E-industry (LIKE)...लवकरच  ) 

Check out Vishal Barge.....

Google+
 
Twitter
 
Life In KPO E-industry (Facebook Page)
www.facebook.com/LIKEbvishal  
 
Facebook

Sunday, 4 January 2015

सुबोध लोकमान्य

आज 'लोकमान्य, एक युगपुरुष' हा चित्रपट पाहायला गेलो. प्रतिसाद अपेक्षेहून प्रचंड होता. एकंदरीत मला चित्रपट फार आवडला. ओम राउतचा पहिला चित्रपट असुनही त्याच दिग्दर्शकीय कौशल्य वाखाणण्याजोग आहे. चित्रपटाच निर्मितीमुल्य हि छान आहे, पण एव्हढ्या मोठया चित्रपटाचा डोलारा ज्या व्यक्तीरेखेवर अवलंबुन होता त्या 'टिळकांची' भूमिका ज्या प्रकारे सुबोध भावेने साकारली आहे त्याला तोड नाही, अगदी अप्रतिम.

खर तर मी चित्रपट पहात नव्हतो तर सुबोधच्या अभिनयाच रसग्रहण करत होतो, संपूर्ण चित्रपटात तो कुठेही सुबोध भावे वाटत नाही तो 'लोकमान्य टिळकच' वाटतो. टिळकांसारख व्यक्तिमत्व साकारताना या माणसाने आपली कल्पनाशक्ती किती पणाला लावली असेल याच राहून राहून आश्चर्य वाटत. अभिनयाची नैसर्गिक जाणच नव्हे तर खोली आणि रुंदी काय असते याचा वस्तुपाठच सुबोधने घालुन दिला आहे.

माझ्या मते अभिनयात ८० टक्के आवाज, १५ टक्के डोळ्यातील भाव आणि ५ टक्के प्रसंगानुरूप देहबोली यांचा सर्वस्वी प्रभाव साकारत असलेल्या भुमिकेवर पडत असतो. मग ती काल्पनिक असो वा ऐतिहासिक आणि  इथेच सुबोधच कौतुक करावंस वाटत. त्याने संपुर्ण चित्रपट भर 'लोकमान्य' हि व्यक्तिरेखा साकारताना कुठेही आवाजाचा पोत आणि पल्ला यावरच नियंत्रण हरवु दिल नाही आणि इथेच त्याने लोकमान्यांच्या व्यक्तीरेखेवरील पकड मजबुत केली. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो  मी मिळवणारच' हे वाक्य म्हणजे त्याच्या वाचिक अभिनयाचा उत्कृष्ट नमुना आहे तुम्ही अगदी डोळे बंद करूनहि टिळकांना  (सुबोधला) पाहु शकता.

माझ्यासाठी दुसरी  आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे डोळ्यातील भाव. सुबोधने टिळकांच्या डोळ्यातील भाव कसे पकडले असतील? मला विचाराल तर काल्पनिक व्यक्तिरेखा साकारताना डोळ्यातील भाव व्यक्त करताना रुदन, क्रोध, आनंद, दुःख इत्यादी नेहमीच आव्हानात्मक असतात, पण ऐतिहासिक व्यक्तित्व साकारताना तर असंभवच होतात, कारण लोकांनी  एकतर त्या विवक्षित व्यक्तीच चित्र किंवा छायाचित्र पाहिलं असत आणि त्या व्यक्तीला ते त्या विवक्षित चित्र किंवा  छायाचित्रानुसार त्याच व्यक्तिमत्व 'कस' यापक्षी 'असच' असेल याचा कायमस्वरूपी ठोकताळा मांडतात आणि इथेच खर आव्हान असत लोकांवर छाप पडण्याच आणि सुबोधने हे आवाहन लीलया पेलल आहे. टिळकांच्या डोळ्यातील करारीपणा त्याने हुबेहूब साकारला आहे.

मला राहुन राहून आश्चर्य वाटत, हि तीच व्यक्ती आहे का? जिने बालगंधर्व साकारले! ते हि दोन रुपात एक 'स्त्री' आणि दुसरा 'पुरुष' आणि आता याच व्यक्तीने 'टिळक' साकारले हा नुसता अभिनेता नाही तर जादुगार आहे.
तिसरी गोष्ट देहबोलीची.'एके काळी आपल्या देशातुन सोन्याचा धुर निघत होता, आणि आता या देशाची माती सुद्धा आपली नाही' या वाक्यात 'आणि आता या वाक्यानंतर एक pause घेत हातातली काठी दोन वेळा  जमिनीवर आपटत पुढील वाक्य म्हणण काय, आणि सिंहगडावरील कड्यावर मावळत्या सूर्याच्या साक्षीने दोन्ही हात पसरवत स्वतःला 'devil टिळक' म्हणुन टिळकांची भव्यता दाखवण काय... 'अप्रतिम' या छोट्या- छोट्या गोष्टी पण अतिशय प्रभावी ठरतात.

मला आवर्जून सांगावसं वाटत, कि ज्यांना अभिनयाची जाण आहे किंवा जे अभिनय करू इच्छितात त्यांनी हा चित्रपट एकदा अभिनयासाठी तरी अवश्य पहावाच. सुबोध भावे सारखे कलाकार असतात जे कलाकार होऊ घातलेल्या किंवा अभिनय करू इच्छीनाऱया व्यक्तीला खाडकन जागेवर आणतात आणि अप्रत्यक्षपणे म्हणतात 'मुर्खा याला अभिनय म्हणतात' तुमच दिसण आणि असण यापेक्षा अभिनय हि कला किती मोठी आहे याची जाणीव करून देतात. जे दिलीप कुमारने भूमिकांमधील वैविध्य आणि भावपूर्ण डोळ्यांनी  दाखवलं (असा असामान्य अभिनेता जो कॅमेराकडे पाठ करूनही आपल्या भावना लोकांपर्यंत पोहचवु शकत होता )   जे राजेश खन्नाने अभिनय कौशल्याने  दाखवलं जे अमिताभ ने आपल्या प्रेझेन्स ने सिद्ध केल जे आमिरने आपल्या वैविध्याने आणि शाहरुखने अभिनयातील सहजतेने सिद्ध केल, नाना पाटेकरने अप्रतिम संवादफेकीने सिद्ध केल आणि इतकच नव्हे तर रॉबर्ट डी निरोने आपल्या प्रतिभेच्या उंचीने जे दाखवलं तेच सुबोध भावे हा मराठी कलाकार आणि मराठी सिनेइतिहासातील उत्कृष्ट अभिनेता अभिनय म्हणजे काय हे दाखवुन देत आहे.

सुबोध तुझ्या अभिनय कौशल्याला माझी मनापासुन दाद आहे. तु भविष्यात याहुनहि सर्वोत्तम देशील असा मला विश्वास वाटतो परमेश्वर तुला सहाय्य करो, हिच माझी सदिच्छा...

Tuesday, 30 December 2014

कर्मकांड

आज 'राजकुमार हिरानीचा' pk release होऊन दहा दिवस उलटून गेले आहेत आणि जशी अपेक्षा होती त्याप्रमाणे धार्मिक संघटनांचे जत्थे त्याविरोधात लाठ्या काठ्या आणि जाळपोळीच साहित्य घेऊन नरसिंहाच्या अवतारात रस्त्यांवर उतरले आहेत.

आता यात राजकारणाचा भाग किती हा भाग अलाहिदा पण आपल्या लोकांची मनोवृत्ती किती अपरिपक्व आणि कुपमंडूक वृत्तीची आहे याच प्रत्यंतर येत. तस पाह्यला गेल तर चित्रपटात आक्षेपार्ह म्हणाव अस काहीच नाही, पण लोक कर्मकांडालाच धर्म समजु लागली आहेत त्यात त्यांचा तरी काय दोष. हजारो वर्षांपूर्वी जी   स्थिती  हिंदू धर्मात निर्माण झाली होती त्याच मुळ हेच होत. त्यावेळी गौतम बुद्धांनी याच कर्म कांडाविरोधात आवाज उठवला होता अगदी निशस्त्र होऊन आणि आज बुद्ध धर्म जगात दुसरया क्रमांकाचा धर्म आहे.पण यात सुद्धा एक गोम आहे, अहिंसेचा संदेश देणारा बौद्ध धर्माचा अंगिकार केलेला चीनसारखा मोठा देश जेव्हा आपली ताकत आजमावू पाहतो, आपल्याच शांतीप्रिय शेजारयावर कुरखोडी करून अशांतता पसरवतो तेव्हा तो आपला मूळ धर्म विसरून कर्मकांडालाच महत्व देत नाही का?

तशीच स्थिती आज भारतीय राजकीय जीवनात निर्माण झाली आहे. कर्मकांड सगळीकडेच फोफावलं आहे शिक्षण, सहकार,साहित्य, क्रिडा आणि समाज सगळीकडेच… जिथे-जिथे मूळ हेतूला तिलांजली देऊन निव्वळ औपचारिकता बळावते तिथे कर्मकांड वाढणारच. आज भारतात फार मोठया प्रमाणावर पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिकवतात पण राजरोसपणे आणि अवास्तव रित्या वाढणारया फि विरोधात कोणी आवाज उठवत नाही हे कर्मकांड. सहकारात राजकारण, भले सामान्य गरीब जनतेला आणि सहकाराच्या मूळ तत्वाला ते धरून का नसेना हे कर्मकांड. साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला साहित्यिक कमी आणि गावगन्ना पुढारी जास्त हे कर्मकांड. क्रिडा संघटनांच्या सर्वोच्चपदी राजकारणी हा अलिखित नियम भले त्याचा खेळाशी बाप जन्मी संबंध का आला नसेना हे कर्मकांड. आणि सर्वात महत्वाच सार्वजनिक निवडणुकात राजकीय वारसा आणि घरातुन आलेल्या उमेदवारालाच निवडून देणे भले तो लायक का नसेना  हे कर्मकांड...

आवाज उठवायाचाय तर ह्या विरोधात उठवा. pk चित्रपटातील धार्मिक मुद्दा हा फक्त प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे, आपल्या देशात तर कर्मकांड सगळीकडेच आहे आणि दुर्दैव हे कि तोच आपला सध्याचा धर्म आहे.
आज आपल्याला या कर्मकांडा विरोधातच आवाज उठवायचा आहे, कारण जे लोक कर्म कांडालाच महत्व देतात ते मानसिक दृष्ट्या दुबळे आणि गुलाम होतात. आणि अशा गुलामी मनोवृत्तीच्या लोकांवर परकीय शक्तींना राज्य करण नेहमीच सोप जात जे याआधी इंग्रजांनी सिद्ध केल आहे. आणि आज अप्रत्यक्षपणे अमेरिका आपल्या social service द्वारे आणि चीन बाजारपेठांवर वर्चस्व गाजवून हे सिद्ध करत आहे. तेव्हा आपण वेळीच सावध होणे आवश्यक आहे.

सरतेशेवटी या विचाराला पुरक असा स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील एक प्रसंग फार बोलका आहे.
स्वामी विवेकानंदांना मांसाहार खाण्यातच नाही तर मांसाहारी अन्न बनवण्यात हि आवड आणि रुची होती. तेव्हा रामकृष्ण परमहंसांच्या काही शिष्यांनी त्यांच्यापाशी नरेंद्रच्या या रुची विषयी चाहाडी केली. रामकृष्ण आपला प्रिय शिष्य नरेंद्र कोण आणि कसा आहे हे चांगलेच जाणून होते. तेव्हा ते शांतपणे आपल्या शिष्यांना एव्हडढेच म्हणाले 'मी गाईला कधी खोटे बोलताना पाहिले नाही, पण गाय ती गायच राहते...

(प्रिय वाचक तुम्हांला आणि तुमच्या कुटुंबीयांना नववर्षाच्या हार्दिक - हार्दिक शुभेच्छा. या नववर्षात तुम्ही आपल्या देव, देश आणि धर्माबद्दल जागरूकपणे विचार करावा अशी सदिच्छा...अस्तु )    

Saturday, 13 December 2014

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेले सुखद अनुभव रुंजी घालत होते… बारा तास अडून राहिलेले messages धडा धड टिक टिक  करत अक्षरश:  कोसळत होते. एक एका group वर पंधरा ते वीस pending messages highlight होत  होते.

बहुदा असे message काय असेल अशी उत्सुकता निर्माण करतात, मी हि उत्सुक होतो... म्हणून एका group वर मी click केल आणि माझा सर्व मुडच बदलुन गेला... पहिला message एका भिबत्स बलात्कारा संधर्भात होता. पण मग गोष्ट इथेच संपत नव्हती, त्या खालो-खाल त्या पिडीतेचे तितकेच भयाण आणि भिभस्त pics टाकले होते. साहजिकच त्या message मध्ये त्या घटनेचा स्पष्टपणे निषेध केला होता पण एव्हढच पुष्कळ आहे ?

जेव्हा पासुन लोकांकडे smart phones उपलब्ध झाले आहेत twitter, whtsapp आणि facebook सारख्या social networking sites ची विपुलता निर्माण झाली आहे, तेव्हापासून लोकांकडे media सारख एक सशक्त माध्यम एखाद्या खेळण्यासारख उपलब्ध झाल आहे. पण त्याचा वापर कितपत आणि कसा करावा याची तितकी समज त्यांच्यात विकसित झाली नाही . हि गोष्ट या  घटनेपुरतीच मर्यादित नाही, तर बरयाचदा खुन, अपघात अशा दुर्दैवी घटनांचे विदारक चित्रण आणि अनाठायी तपशील दिला जातो याचा परिणाम असा होतो कि लोकांना अशा घटनांचे बळी ठरलेल्यांबद्दल सहानुभूती वाटते, पण त्यात अनुभूतीचाच भाग अधिक असतो, आणि जेव्हा अनुभूतीचा अतिरेक होतो तेव्हा ती विकृती धारण करते, आणि हळू-हळु  अशा घटनांच्या post पाहणे हि निव्वळ उत्सुकता राहते आणि जिथे निव्वळ उत्सुकता राहते तिथे अशा घटना आणि त्यांच छायाचित्रण किंवा चित्रीकरण एक मनोरंजनाच साधन बनुन राहतात.

दुर्दैवाने  या social साक्षरतेच्या अभावी जगात आणि भारतात अशा कित्येक विकृत स्वरूप धारण केलेल्या post वनव्या सारख्या पसरत आहेत. ज्या लोकांच्या भावना बधीर करत आहेत. जस शस्त्रक्रिया करताना डॉक्टर त्या अवयवाची चिरफाड करतो पण ती जाणवत नाही, पण शस्त्रक्रिया आपल काम मात्र करत असते. तशा प्रकारे या posts लोकांच्या भावना बधीर करून त्यात विकृती पसरवण्याच काम करत आहेत. आणि  आश्चर्याची गोष्ट म्हणजे हि विकृती पसरवण्याच काम आपण स्वतः च करत आहोत.

अस म्हणतात कि समाजाचच प्रतिबिंब माध्यमांद्वारे व्यक्त होत. तेव्हा अशा समाजात एखाद्या दुर्दैवी घटनेत बळी गेलेल्या मुलाच्या आईला किंवा आत्याचारीत मुलीच्या वडीलांना किंवा स्वतः पिडीत व्यक्तीला 'आप को कैसा लग रहा है?'  हा प्रश्न सहजपणे विचारला जातो, तिथे सनसनीखेज बातम्यांमध्ये निव्वळ उत्सुकता चाळवणारे प्रसंग दाखवले जातात, तिथे अपघात किंवा अगदी बलात्कारासारखे प्रसंग चित्रित करायला कॅमेरे सरावतात पण मदतीचा हात पुढे येत नाही.

मित्रांनो, समाज पुरुष हा एक फार मोठा प्राणी आहे. तिथे कोणाला दोषी ठरवता येत नाही, मात्र दोषी सर्वच असतात. तेव्हा जागरूक व्हा... आत्मपरीक्षण करा. घडणारा प्रसंग घडून जातो, अत्याचारी त्याच काम करून शिक्षाही भोगतो, पण अशा दुर्दैवी घटनांचा प्रसार करून आपण अप्रत्यक्षपणे त्या घटनांच उद्दतीकरण तर करत नाही ना? याच भानही ठेवायला हव.

शेवटी भावना दाखवण्याची नाही तर व्यक्त करण्याची गोष्ट आहे. सोप्या भाषेत सांगायच तर कॅलेंडर वरच्या मॉडेल्स भावना (?) दाखवतात तेव्हा तोंडातून 'आह' येत... पण जेव्हा तीच भावना एखादी अभिनेत्री फक्त डोळ्याने व्यक्त करते तेव्हा आतून 'वाह' येत. बाकी सांगणे न लगे तुम्ही सुज्ञ  असा. 

अस्तु ….  

Monday, 14 April 2014

एक आणि एकी

काल एका न्यूज चैनल वर एका राजकीय पक्षाच्या सभेसाठी जमा झालेल्या जनतेच्या मुलाखती घेण्यात येत होत्या. लोक उत्साहाने सभेस आले होते. २५-३० किलोमीटर दूर  अंतरावरूनही आले होते आणि येताना  जेवणासाठी डबेही घेऊन आले होते...

जो तो त्यांच्या नेत्याचे समर्थन करत होता. त्यांचच सरकार  याव अशी इच्छा जाहीर करत होता. बहुतांश समाज कष्टकरी वर्गातलाच दिसत होता आणि इकडे बातमीदार त्यांच समर्थना मागील इस्पित जाणू इच्छित होता. तो धूर्तपणे म्हणाला 'उच्च वर्गातील लोक तर यावेळी दुसरयाच पक्षाला समर्थन देणार आहेत' त्यावर बहुतांश लोकांच एकच उत्तर आमचाच नेता निवडून येईल....

इथे जाणून  घ्यायचा मुद्दा एकच, आणि तो म्हणजे आपला भारतीय समाज स्वतः भोवतीच्या  कोशातच कसा गुरफटला आहे... निवडणुकीत जात हा मुद्दा किती परिणाम कारक ठरू शकतो...आणि या एका गोष्टीनेच भारतीय समाज कसा विभाजित झाला आहे...

इथे  मतदार फक्त मतदार न राहता 'अल्पसंख्यांक' आणि 'जातीय' कक्षेत मापला जातो. त्यामुळे सार्वजनिक स्तरावर देशाच हित पाहिल न जाता समाज आपल्या समुदायाच हित पाहू लागतो आणि इथेच एकीच बळ कमी पडत. जेव्हा एकीच बळ कमी पडत तेव्हा समाज दुबळा होतो आणि दुबळा समाज असलेला देश स्वतंत्र नसतो.

इतिहासात डोकावून पाहिल तर आपल्या याच दुर्बलतेचा फायदा पूर्वी इंग्रजांनी घेतला आणि आता आपलेच काही देश बांधव  घेत आहेत, आणि हे सत्य आहे की दुबळी व्यक्ती आणि समाज केव्हाच  स्वतंत्र  नसतात. पूर्वी परक्यांनी गुलाम बनवल आज आपलेच बनवतायत. आपल्या  देशात डझनाहूनही जास्त राजकीय पक्ष असण्याच हेच कारण आहे.

आपल्या विखारी भाषणात काही नेते  मग विशिष्ठ  समुदायाला खुश करण्यासाठी बेताल वक्तव्य करतात पण निषेध करण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही, कारण आपण निर्बल आहोत आणि आपल्यात एकी नाही तेव्हा जागे व्हा देश हितास प्राधान्य द्या समुदायास नाही. 'एकी दाखवा एक व्हा'...

Saturday, 12 April 2014

लागे-बांधे

 सध्या राजकीय वातावरण चांगलाच तापल आहे, प्रत्येक जन एकमेकांची जुनी प्रकरण उकरून काढत आहे. कोणी धार्मिक, कोणी उद्योग जगातील लागेबान्ध्यांची आणि जमल्यास अनधिकृत बांधकामांची.... पण कोणालाही जनतेबद्दलचा विशेष कळवळा दिसून येत नाही.

जुनी प्रकरणे उकरण्या ऐवजी ती वेळीच निदर्शनास आणून होऊ घातलेले गैर व्यवहार का रोखले जात नाहीत? कारण तस साफच आहे दुसरयाकडे बोट दाखवणारा हेही जाणून असतो की उरलेली चार बोटे त्याच्याकडे आहेत विशेषतः राजकारणात तरी...

एकदा का राजकीय निवडणुकीचे रंग उतरले की विविध पक्षांचे तुझ्या गळा माझ्या गळा सुरु... जनतेचे प्रश्न दुय्यम आणि प्रतिनिधींचा वैयक्तिक स्वार्थ प्रार्थमिकता प्राप्त करतो. संसदेतील खासदारांच्या वाढवण्यात आलेल्या भत्त्या संदर्भातील प्रकरण सर्व परिचित आहेच.

अशा वेळी रवींद्रनाथ टागोर यांचे विचार योग्य वाटतात ते असे की "आपणाला जे पाहिजे ते सरकारने लगेच दिले तर सरकार व प्रजा यांच्यात सलोखा निर्माण होईल असे काहींना वाटते, पण एका बाजूने भीक मागणे व दुसरया बाजूने भीक घालणे या गोष्टी संपणार कधी?"

इथे टागोरांना हेच सांगायच आहे की प्रजेने सरकारचे मिंधे न राहता स्वतः हून  पुढाकार घेऊन देश सेवा करावी तरच देशाचा उद्धार होईल. बाकी एक सरकार जाऊन दुसर येईल, हे चक्र सुरूच राहणार... मग काय आपण दरवेळी आशाळभूतपणे कोणा पक्ष किंवा व्यक्तीकडे पाहत राहणार? की जो आपला उद्धार करील....

राष्ट्रात कोणी एक व्यक्ती कधीच हिरो होऊ शकत नाही कारण राष्ट्र निर्माण हे सामुहिक कार्य आहे, कोणा एका व्यक्तीच नव्हे... तेव्हा विचार करा आणि राष्ट्रासाठी मतदान करा कोणा व्यक्ती किंवा पक्षासाठी नव्हे.