उस्मानने एका क्षणात झटपट एक व्यंगचित्र काढलं, व्यंगचित्रात त्याचा हात आता चांगलाच बसला होता.समीरने त्याच्या कलेबद्दल ऐकलं होतं पण आज प्रत्यक्षात त्याने अनुभूती घेतली,परंतु न्यूनगंडाची एक अनामिक लहर त्याच्या अंगात संचारली आणि त्याचा निचरा करणं त्याला आवश्यक होतं.
व्हीलचेअर काही बोलण्याच्या इराद्याने त्याने पुढे सरकवली.
"यार उस्मान, व्यंगचित्र फार सही काढतोस रे!"
उस्मान थोडं हसून म्हणाला
"काही नाही रे, सरावाने सगळं काही होतं"
"यार, मला जर वेळ असता ना...तर.."
समीरने सवयीप्रमाणे वाक्य योग्य ठिकाणी अर्धवट सोडलं, पण उस्मानला त्याच्या अर्धवट वाक्यातून व्हायचा तो बोध झाला.पण उस्मानने त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला,
"अरे मी सुद्धा सुरवाती - सुरवातीला साधी आणि बालिश चित्र काढायचो"
समीरने फक्त एक हुंकार दिला, त्याची निराशा साफ झळकत होती. पण शेवटी त्याने उस्मानला एका खोचक प्रश्नाचा गुगली टाकलाचं जो त्याला कधीच आवडायचा नाही.
"उस्मान,तू इतकी वर्षे व्यंगचित्रे काढतोयस पण मी तुझं एकही व्यंगचित्र कुठल्याही दिवाळी अंकात किंवा पेपरमध्ये पाहिलं नाही .असं का बरं?"
उस्मानला समीरचा हा प्रश्न खोचक की साधेपणाने विचारला गेला आहे हे कळायला काही मार्ग नव्हता,तो जरा भोळाच होता.पण समीरचा तो प्रश्न त्याला खोलवर कोठेतरी डाचला.त्याला आता आपली पडती बाजू सांभाळायची होती.जमेल तेव्हढा निश्चिन्त चेहरा करून तो म्हणाला,
"मीच कधी व्यंगचित्र छापायला दिली नाहीत,मी फक्त छंद म्हणून व्यंगचित्र काढतो."
उस्मान असं बोलला खरं पण प्रत्यक्षात त्याला प्रसिद्धीची मनापासून इच्छा होती.त्याचाकडे कला असूनही त्याद्वारे प्रसिद्धी मिळवण्याचा त्याचा ध्यास कुठेतरी कमी पडत होता.
एव्हढ्यात तिथे उस्मानचा मित्र कणगुले आला.
कणगुले! ग्रामीण भागातून आलेला मुलगा , साधा होता पण गबाळा नव्हता. कुणाला काही विचारण्यात खोचकतेपेक्षा रोचकता जास्त.यानेच उस्मानकडून व्यंगचित्र काढण्यातलं तंत्र आणखी मजबूत करून घेतलं होतं.आपल्या ग्रामीण बाजाच्या भाषेबद्दल कोणताच न्यूनगंड नसलेला पण योग्य वेळी योग्य तेच बोलणारा, बोलण्यापेक्षा याला ऐकण्यात भारी रस! मनाने स्वतः सरळ म्हणून बाकीचेही याला त्याच्या सारखे सरळ आणि चांगले वाटायचे. या सर्व नैसर्गिक भावनांचा आणि गुणांचा परिपोष काय?तर चेहऱ्यावर झळकणारा साधेपणा आणि निरागसता जी कोणालाही दिखाऊपणा करून साधता आली नसती.
समीर आणि उस्मानला स्मित करून त्याने उत्साही चेहऱ्याने उस्मानला सांगितले,
"आरं, आज म्या पुण्याच्या पेपर एजन्सीतं तुला काल दाखावल्यालं यंगचित्र पाठवलंय"
उस्मान नाटकीय चेहरा करून म्हणाला,
"काय सांगतोस?अरे व्वा!"
समीर मक्खपणे कणगुले कडे पहात होता,पण कणगुले मात्र पेपरात आपले व्यंगचित्र एक - दोन आठवडयात छापून येईल या आशेने खुश होता.
- विशाल बळवंत बर्गे
No comments:
Post a Comment