परवा काही कामानिमित्त बाहेर जावं लागलं पण काही कारणाने ते काम काही पूर्ण झाले नाही,काम न झाल्याबद्दल मनात काही विशेष खेद नव्हता.
मी बाहेर येऊन स्कूटर स्टँडवरून काढली आणि नेहमीप्रमाणे उजव्या बाजूला कलती करून एक जोराची किक मारली,पण प्रतिसाद काहीच नाही.अगदी त्यावेळच्या पावसासारखा.जुलै महिना संपत आला तरी या महाशयांचा पत्ता नाही.दरवेळी पाऊस म्हटलं की रस्त्यावर असणारी चीक चीक , पायात स्लीपर घालून फडक फडक कुठे जात असताना अचानक जाणवतं की आपल्या पॅन्ट आणि शर्टवर चिखलाचे शिंतोडे उडाले आहेत आणि त्यावेळी होणारा त्रागा.
पण आता मात्र मला पावसात दाटणारी हिरवळ , मातीचा सुगंध आणि हवेतील आल्हाद आठवायचा.किती खरं आहे की माणसाला त्याच्या सुखाच्या क्षणात दुःखाची क्षुल्लकशी छायाही नकोशी असते आणि दुःखाच्या वेळी तो सुखाची आठवण करत बसतो.दुसऱ्या वेळी मी पुन्हा एकदा किक मारली आणि स्कूटर माझ्या मनगटाच्या तालावर गुरगुरायला लागली.समाधानाने मी तिथून निघालो तितक्यात पावसाला सुरवात झाली. पहिल्यांदा बारीकश्या भुरभुरीचे अचानक मोठ्या सरीत रूपांतर झाले व नाईलाजाने मला एका पान टपरीचा आश्रय घ्यावा लागला.तिथून मी पावसाची रिमझिम तटस्थपणे पहात होतो.रस्त्यावरील बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर पाऊस म्हटलं की तो यायचाच असे मुर्दाड भाव नव्हते तर एकदाचा आला बाबा असे सस्मित भाव होते.
पण एव्हढ्यात व्हायचं तेच झालं, वरून राजाने आपला हात अचानक आखडता घेतला.याचकांना दान देता देता राजाने अचानक माघार घ्यावी व त्यावेळी उर्वरित याचकांची जी भावावस्था व्हावी त्याप्रमाणे त्यावेळी बहुतेक लोकांची झाली असावी.
तर,पावसाचा जोर ओसरल्यावर तिथून निघणार इतक्यात एक पासष्टी पार केलेले बाबा म्हणाले,
'पवार वस्ती?'
मी म्हणालो,
'शाहूनगर!'
'ठीक है,वहाँ तक छोड़ दोगे बेटा'
इति बाबा
'ठीक है,बैठिये'
आणि आम्हा दोघांचा प्रवास सुरू झाला. साहजिकच एखाद्या व्यक्तीने थोडीफार मदत केली की त्याच्याशी प्रेमपूर्ण वार्तालाप करून शिष्टाचार पाळण्याचे काम बाबांनी सुरू केले
'अभी तो बारिश ही नही है'
'हाँ - हाँ!'
मी बाबांच्या प्रत्येक गोष्टीत हामी भरत होतो,ही मला अगदी जडून गेलेली सवयच आहे कोणाच्याही कोणत्याही गोष्टीला हो ला हो म्हणून अनुमोदन देण्याची.या सवयीमध्ये भिडस्तपणा असण्यापेक्षा दुसऱ्याच्या मतांचा आपण आदर करत आहोत ही वृत्तीच जास्त.
'पाप बहोत बढ़ गया है'
'हाँ - हाँ'
'माँ - बाप को कोई पूछता ही नही,बस में बैठने के लिए बूढों को जगह नही देते...,
इत्यादी इत्यादी
यावेळी मला जाणवलं की बाबा स्वतः घेतलेले अनुभवच मला गप्पांच्या ओघात सांगत आहेत.मला वाटतं बाबांच्या ऐवजी माझ्या बरोबर कोणी चाळीशीची व्यक्ती असती तर तिने असे आपले पूर्वी घेतलेले अनुभव चुकूनही सांगितले नसते,कारण त्याला माहित आहे की तो जेव्हा बसमधून प्रवासाला कुठे जात असतो तेव्हा तो बसमधल्या म्हाताऱ्या जोडप्याचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या बायका पोरांच्या सोयीसाठी त्यांना जागा करून देण्यातच धन्यता मानेल. याउलट आणखी कमी म्हणजे पंचवीशीचा एखादा युवक असता तर तो संबंध प्रवासात माझ्याशी बहुदा तुरळक किंवा काहीच बोलला नसता,कारण त्याला त्याच्या इच्छीत स्थळी पोहचण्याची घाई असते व आपल्याला तिथे जाऊन काय करायचंय याचे तो आडाखे बांधत असतो,म्हणजे तो स्व-केंद्रित वृत्तीचा असतो.
म्हणजे पंचविशीचा युवक जो स्व-केंद्रित वृत्तीचा असतो,स्वतःची ध्येये आणि स्वप्नपूर्ती याकडेच ज्याचं सारं लक्ष एकवटलेले असतं तो लग्नानंतर अचानक आपल्या बायकोबद्दल नंतर मुलांबद्दल सजग राहतो व त्यांच्या सुखाचा विचार करू लागतो व मग शेवटी उतारवयात जेव्हा तो एकटासा पडतो तेव्हा त्याला जाणवतं की आपलं तसं कोणी नाही व इतरांनी जाणून- बुजून केलेल्या दुर्लक्षामुळे त्याचा त्रागा होतो व असा कोणत्याही प्रसंगी आपल्या मनातले भाव व्यक्त करण्यास ते प्रवृत्त होतात.
एकंदरीत काय तर माणूस आपल्या क्षमतांचा वापर उमेदीच्या काळात एक तर स्वतःसाठी आणि नंतर फक्त आपल्या लोकांसाठी करतो , समाजाप्रतीची जाणीव किंवा दायित्व या गोष्टींपासून तो अलिप्त राहतो व उमेदीची वर्ष ओसरल्यावर समाजाच्या दायित्वाची त्याला आठवण होते.
एव्हाना शाहूनगरच्या वळणावर गाडी आली होती, बाबा 'थँक्यू' म्हणून तिथे उतरले आणि मी ही माझे उत्तरदायित्व पार पाडून माझ्या वाटेला लागलो.
- विशाल बळवंत बर्गे
No comments:
Post a Comment