बहुतांश लोकांची अशी सुप्त इच्छा असते की त्याची जगातील कोणत्यातरी लहान मोठ्या, सजीव - निर्जीव वस्तूवर त्याची स्वतः ची एक छत्री सत्ता असावी.हीच इच्छा त्याच्या मरणासन्न अवस्थेतही कायम राहते, म्हणूनच की काय त्याच्या मृत्यूनंतरही ती सत्ता त्याच्या पुत्ररुपी अंशाने चालवावी किंवा वाढवावी अशी व्यवस्था लावूनच तो पायउतार होतो आणि जगाचा निरोप घेतल्यानंतरही त्याचा वारसा तो मागे ठेऊन जातो.
वारसा मूक राहूनही सांगत असतो की मी या विवक्षित गोष्टीचा एकमात्र मालक आहे.आमच्या पूर्वजांनी त्यांच्या पराक्रमाने तिच्यावर हक्क प्रस्थापित केला आहे आणि वर्तमान काळात मी तिचा राजा आहे आणि भविष्यातही मी ठरवेल तोच तिचा वारस असेल.
वारसा ही जरी व्यक्तीनिष्ठ संकल्पना असली तरी तिचा व्यापक दृष्टीने समाज हितावर परिणाम होतो.जसे आज भारत हा लोकशाही देश म्हणून स्वतःला अभिमानाने मिरवत असला तरी स्वातंत्र्यानंतर बहुतांश सत्ता गांधी घराण्याकडेच सुपूर्द झाली आहे.पंडित नेहरूनंतर त्यांची मुलगी पंतप्रधान होते आणि त्यानंतर राजीव गांधी आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सोनिया गांधी या त्यांच्या पक्षाच्या सर्वेसर्वा आहेत आणि त्यांनीही त्यांचा पुत्र राहुल गांधी यास पक्षाचा वारस करण्याची पुरेशी व्यवस्था लावली आहे. तर मग प्रश्न असा पडतो की लोकशाहीतच जर घराणेशाही सुप्तपणे शिरकाव करत असेल तर त्या लोकशाहीला अर्थच काय?
दुसरे आणखी एक उदाहरण घ्यायचं झाले तर ठाकरे घराण्याचे.प्रसिद्ध लोकप्रबोधनकार के.सी.ठाकरे यांच्या संस्काराची ताकद अफाट म्हणायला हवी की त्यांनी ज्याप्रकारे लोकांच्या अस्मितेस किर्तनाद्वारे जाग आणली तोच अस्मितेचा जागर मराठी मना मनात आपल्या कृतीद्वारे पेटवला तो त्यांचे पुत्र बाळासाहेब ठाकरे यांनी परंतु त्यांनीही आपल्या पक्षाचा वारस त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांना केलं.
वरील उदाहरणं देशांतर्गत असली तरी हीच स्तिथी विदेशातही कायम आहे मग तो देश प्रगत असो वा अप्रगत, इथून तिथून माणसाची कोणालातरी सर्वोच्च स्थानी बसवून त्यानंतर त्याच्या वारसांना पूजण्याची मूळ स्वाभाविक वृत्ती सारखीच दिसते ज्याला आपण मेंढरांच्या कळपाची उपमा देऊ शकतो.
घराणेशाहीचा मला इथे विरोध करायचा नाही परंतु घराणेशाहिमध्ये निर्माण होणारे वारस त्या कार्यास लायक असतीलच असे नाही आणि त्यामुळे जर इतरांच्या संधी डावलल्या जात असतील अथवा इतरांचे नुकसान होत असेल तर निश्चितच ही स्वतः समाजाने ओढवून घेतलेली दुर्दैवी बाब आहे.ती तिथेच मोडीत काढणे हे सर्व समाज घटकांचं कर्तव्य आहे.
सहसा लोकांचा असा दृष्टिकोन असतो की त्याचे वडील असे होते तर त्याचा मुलगाही त्याच्या पावलावर पाऊल टाकून आपला उद्धार करेल परंतु ते हे विसरतात की तो पाऊल टाकेल पण ठसा उमटवेल याची काय शाश्वती?
माणूस म्हटला की स्वार्थ आलाच पण स्वार्थ दोन प्रकारचे असतात एक वैयक्तिक स्वार्थ तर दुसरा सामाजिक . सामाजिक स्वार्थ हा सर्वात घातक कारण तो एका व्यक्तीला केंद्र बिंदू ठेवून संपूर्ण समाजाला वेठीस धरून त्याचं नुकसान करतो.स्वार्थ ही भावना मुळात वाईट नाही ती नैसर्गिकच आहे आणि म्हणून उपयोगीही परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक विनाशास कारणीभूत ठरतो.
आपण ज्या मेहनतीने सत्ता कमावली ती सत्ता सहजा सहजी दुसऱ्या आणि घराबाहेरील व्यक्तीस देणं म्हणजे अगदीच काही सोप्पं काम नाही, मग ती त्रयस्थ व्यक्ती त्यासाठी कितीही लायक असली तरी.टाटा आणि इन्फोसिस ह्या कॉर्पोरेट जगतातील सायरस मिस्त्री आणि विशाल सिक्का ही उदाहरणं तर ताजीच आहेत.
वैयक्तिक संपत्तीबाबत स्वार्थ किंवा आणखी सुसंस्कृत शब्दात वारसदार ही संकल्पना ठीक आहे परंतु जर ती समाजाप्रती वाहिलेली संस्था अथवा संघटना असेल तर इथे घराणेशाहीचा शिरकाव निश्चितच घातक आहे.
सामाजिक स्तरावर जिथे सर्व समाजाचं हित निहित आहे अशा ठिकाणी या वारसदार संकल्पनेस पायबंद घालणे आज अगदी आवश्यक झाले आहे.या करता लोकांनीच एकत्र येऊन पुढाकार घेणं आवश्यक आहे.जिथे जिथे तुम्हाला घराणेशाहीचा शिरकाव होताना दिसेल तिथे तिथे तुम्ही त्याविरुद्ध आवाज उठवून त्याला नकार द्यायला हवा हा तुमचा आणि संपूर्ण समाजाचा हक्क आहे.हा नकार तुम्ही सार्वजनिक निवडणुकीत उभ्या राहिलेल्या एखाद्या बड्या नेत्याच्या नालायक मुलाविरुद्ध वापरू शकता किंवा सहकारी तत्वावर चालणाऱ्या संस्थेत शिरकाव करू पाहणाऱ्या बड्या असामीचा.आज असं करणं ही काळसुसंगत आवश्यक बाब आहे. नाहीतर ज्या प्रकारे फ्रान्समध्ये राज्यक्रांती होऊन तेथील सामान्य जनतेने संपूर्ण सत्ता पालट केला तो दिवस दूर नाही.
- विशाल बळवंत बर्गे
No comments:
Post a Comment