Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Tuesday, 30 December 2014

कर्मकांड

आज 'राजकुमार हिरानीचा' pk release होऊन दहा दिवस उलटून गेले आहेत आणि जशी अपेक्षा होती त्याप्रमाणे धार्मिक संघटनांचे जत्थे त्याविरोधात लाठ्या काठ्या आणि जाळपोळीच साहित्य घेऊन नरसिंहाच्या अवतारात रस्त्यांवर उतरले आहेत.

आता यात राजकारणाचा भाग किती हा भाग अलाहिदा पण आपल्या लोकांची मनोवृत्ती किती अपरिपक्व आणि कुपमंडूक वृत्तीची आहे याच प्रत्यंतर येत. तस पाह्यला गेल तर चित्रपटात आक्षेपार्ह म्हणाव अस काहीच नाही, पण लोक कर्मकांडालाच धर्म समजु लागली आहेत त्यात त्यांचा तरी काय दोष. हजारो वर्षांपूर्वी जी   स्थिती  हिंदू धर्मात निर्माण झाली होती त्याच मुळ हेच होत. त्यावेळी गौतम बुद्धांनी याच कर्म कांडाविरोधात आवाज उठवला होता अगदी निशस्त्र होऊन आणि आज बुद्ध धर्म जगात दुसरया क्रमांकाचा धर्म आहे.पण यात सुद्धा एक गोम आहे, अहिंसेचा संदेश देणारा बौद्ध धर्माचा अंगिकार केलेला चीनसारखा मोठा देश जेव्हा आपली ताकत आजमावू पाहतो, आपल्याच शांतीप्रिय शेजारयावर कुरखोडी करून अशांतता पसरवतो तेव्हा तो आपला मूळ धर्म विसरून कर्मकांडालाच महत्व देत नाही का?

तशीच स्थिती आज भारतीय राजकीय जीवनात निर्माण झाली आहे. कर्मकांड सगळीकडेच फोफावलं आहे शिक्षण, सहकार,साहित्य, क्रिडा आणि समाज सगळीकडेच… जिथे-जिथे मूळ हेतूला तिलांजली देऊन निव्वळ औपचारिकता बळावते तिथे कर्मकांड वाढणारच. आज भारतात फार मोठया प्रमाणावर पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिकवतात पण राजरोसपणे आणि अवास्तव रित्या वाढणारया फि विरोधात कोणी आवाज उठवत नाही हे कर्मकांड. सहकारात राजकारण, भले सामान्य गरीब जनतेला आणि सहकाराच्या मूळ तत्वाला ते धरून का नसेना हे कर्मकांड. साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला साहित्यिक कमी आणि गावगन्ना पुढारी जास्त हे कर्मकांड. क्रिडा संघटनांच्या सर्वोच्चपदी राजकारणी हा अलिखित नियम भले त्याचा खेळाशी बाप जन्मी संबंध का आला नसेना हे कर्मकांड. आणि सर्वात महत्वाच सार्वजनिक निवडणुकात राजकीय वारसा आणि घरातुन आलेल्या उमेदवारालाच निवडून देणे भले तो लायक का नसेना  हे कर्मकांड...

आवाज उठवायाचाय तर ह्या विरोधात उठवा. pk चित्रपटातील धार्मिक मुद्दा हा फक्त प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे, आपल्या देशात तर कर्मकांड सगळीकडेच आहे आणि दुर्दैव हे कि तोच आपला सध्याचा धर्म आहे.
आज आपल्याला या कर्मकांडा विरोधातच आवाज उठवायचा आहे, कारण जे लोक कर्म कांडालाच महत्व देतात ते मानसिक दृष्ट्या दुबळे आणि गुलाम होतात. आणि अशा गुलामी मनोवृत्तीच्या लोकांवर परकीय शक्तींना राज्य करण नेहमीच सोप जात जे याआधी इंग्रजांनी सिद्ध केल आहे. आणि आज अप्रत्यक्षपणे अमेरिका आपल्या social service द्वारे आणि चीन बाजारपेठांवर वर्चस्व गाजवून हे सिद्ध करत आहे. तेव्हा आपण वेळीच सावध होणे आवश्यक आहे.

सरतेशेवटी या विचाराला पुरक असा स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील एक प्रसंग फार बोलका आहे.
स्वामी विवेकानंदांना मांसाहार खाण्यातच नाही तर मांसाहारी अन्न बनवण्यात हि आवड आणि रुची होती. तेव्हा रामकृष्ण परमहंसांच्या काही शिष्यांनी त्यांच्यापाशी नरेंद्रच्या या रुची विषयी चाहाडी केली. रामकृष्ण आपला प्रिय शिष्य नरेंद्र कोण आणि कसा आहे हे चांगलेच जाणून होते. तेव्हा ते शांतपणे आपल्या शिष्यांना एव्हडढेच म्हणाले 'मी गाईला कधी खोटे बोलताना पाहिले नाही, पण गाय ती गायच राहते...

(प्रिय वाचक तुम्हांला आणि तुमच्या कुटुंबीयांना नववर्षाच्या हार्दिक - हार्दिक शुभेच्छा. या नववर्षात तुम्ही आपल्या देव, देश आणि धर्माबद्दल जागरूकपणे विचार करावा अशी सदिच्छा...अस्तु )    

Saturday, 13 December 2014

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेले सुखद अनुभव रुंजी घालत होते… बारा तास अडून राहिलेले messages धडा धड टिक टिक  करत अक्षरश:  कोसळत होते. एक एका group वर पंधरा ते वीस pending messages highlight होत  होते.

बहुदा असे message काय असेल अशी उत्सुकता निर्माण करतात, मी हि उत्सुक होतो... म्हणून एका group वर मी click केल आणि माझा सर्व मुडच बदलुन गेला... पहिला message एका भिबत्स बलात्कारा संधर्भात होता. पण मग गोष्ट इथेच संपत नव्हती, त्या खालो-खाल त्या पिडीतेचे तितकेच भयाण आणि भिभस्त pics टाकले होते. साहजिकच त्या message मध्ये त्या घटनेचा स्पष्टपणे निषेध केला होता पण एव्हढच पुष्कळ आहे ?

जेव्हा पासुन लोकांकडे smart phones उपलब्ध झाले आहेत twitter, whtsapp आणि facebook सारख्या social networking sites ची विपुलता निर्माण झाली आहे, तेव्हापासून लोकांकडे media सारख एक सशक्त माध्यम एखाद्या खेळण्यासारख उपलब्ध झाल आहे. पण त्याचा वापर कितपत आणि कसा करावा याची तितकी समज त्यांच्यात विकसित झाली नाही . हि गोष्ट या  घटनेपुरतीच मर्यादित नाही, तर बरयाचदा खुन, अपघात अशा दुर्दैवी घटनांचे विदारक चित्रण आणि अनाठायी तपशील दिला जातो याचा परिणाम असा होतो कि लोकांना अशा घटनांचे बळी ठरलेल्यांबद्दल सहानुभूती वाटते, पण त्यात अनुभूतीचाच भाग अधिक असतो, आणि जेव्हा अनुभूतीचा अतिरेक होतो तेव्हा ती विकृती धारण करते, आणि हळू-हळु  अशा घटनांच्या post पाहणे हि निव्वळ उत्सुकता राहते आणि जिथे निव्वळ उत्सुकता राहते तिथे अशा घटना आणि त्यांच छायाचित्रण किंवा चित्रीकरण एक मनोरंजनाच साधन बनुन राहतात.

दुर्दैवाने  या social साक्षरतेच्या अभावी जगात आणि भारतात अशा कित्येक विकृत स्वरूप धारण केलेल्या post वनव्या सारख्या पसरत आहेत. ज्या लोकांच्या भावना बधीर करत आहेत. जस शस्त्रक्रिया करताना डॉक्टर त्या अवयवाची चिरफाड करतो पण ती जाणवत नाही, पण शस्त्रक्रिया आपल काम मात्र करत असते. तशा प्रकारे या posts लोकांच्या भावना बधीर करून त्यात विकृती पसरवण्याच काम करत आहेत. आणि  आश्चर्याची गोष्ट म्हणजे हि विकृती पसरवण्याच काम आपण स्वतः च करत आहोत.

अस म्हणतात कि समाजाचच प्रतिबिंब माध्यमांद्वारे व्यक्त होत. तेव्हा अशा समाजात एखाद्या दुर्दैवी घटनेत बळी गेलेल्या मुलाच्या आईला किंवा आत्याचारीत मुलीच्या वडीलांना किंवा स्वतः पिडीत व्यक्तीला 'आप को कैसा लग रहा है?'  हा प्रश्न सहजपणे विचारला जातो, तिथे सनसनीखेज बातम्यांमध्ये निव्वळ उत्सुकता चाळवणारे प्रसंग दाखवले जातात, तिथे अपघात किंवा अगदी बलात्कारासारखे प्रसंग चित्रित करायला कॅमेरे सरावतात पण मदतीचा हात पुढे येत नाही.

मित्रांनो, समाज पुरुष हा एक फार मोठा प्राणी आहे. तिथे कोणाला दोषी ठरवता येत नाही, मात्र दोषी सर्वच असतात. तेव्हा जागरूक व्हा... आत्मपरीक्षण करा. घडणारा प्रसंग घडून जातो, अत्याचारी त्याच काम करून शिक्षाही भोगतो, पण अशा दुर्दैवी घटनांचा प्रसार करून आपण अप्रत्यक्षपणे त्या घटनांच उद्दतीकरण तर करत नाही ना? याच भानही ठेवायला हव.

शेवटी भावना दाखवण्याची नाही तर व्यक्त करण्याची गोष्ट आहे. सोप्या भाषेत सांगायच तर कॅलेंडर वरच्या मॉडेल्स भावना (?) दाखवतात तेव्हा तोंडातून 'आह' येत... पण जेव्हा तीच भावना एखादी अभिनेत्री फक्त डोळ्याने व्यक्त करते तेव्हा आतून 'वाह' येत. बाकी सांगणे न लगे तुम्ही सुज्ञ  असा. 

अस्तु ….  

Monday, 14 April 2014

एक आणि एकी

काल एका न्यूज चैनल वर एका राजकीय पक्षाच्या सभेसाठी जमा झालेल्या जनतेच्या मुलाखती घेण्यात येत होत्या. लोक उत्साहाने सभेस आले होते. २५-३० किलोमीटर दूर  अंतरावरूनही आले होते आणि येताना  जेवणासाठी डबेही घेऊन आले होते...

जो तो त्यांच्या नेत्याचे समर्थन करत होता. त्यांचच सरकार  याव अशी इच्छा जाहीर करत होता. बहुतांश समाज कष्टकरी वर्गातलाच दिसत होता आणि इकडे बातमीदार त्यांच समर्थना मागील इस्पित जाणू इच्छित होता. तो धूर्तपणे म्हणाला 'उच्च वर्गातील लोक तर यावेळी दुसरयाच पक्षाला समर्थन देणार आहेत' त्यावर बहुतांश लोकांच एकच उत्तर आमचाच नेता निवडून येईल....

इथे जाणून  घ्यायचा मुद्दा एकच, आणि तो म्हणजे आपला भारतीय समाज स्वतः भोवतीच्या  कोशातच कसा गुरफटला आहे... निवडणुकीत जात हा मुद्दा किती परिणाम कारक ठरू शकतो...आणि या एका गोष्टीनेच भारतीय समाज कसा विभाजित झाला आहे...

इथे  मतदार फक्त मतदार न राहता 'अल्पसंख्यांक' आणि 'जातीय' कक्षेत मापला जातो. त्यामुळे सार्वजनिक स्तरावर देशाच हित पाहिल न जाता समाज आपल्या समुदायाच हित पाहू लागतो आणि इथेच एकीच बळ कमी पडत. जेव्हा एकीच बळ कमी पडत तेव्हा समाज दुबळा होतो आणि दुबळा समाज असलेला देश स्वतंत्र नसतो.

इतिहासात डोकावून पाहिल तर आपल्या याच दुर्बलतेचा फायदा पूर्वी इंग्रजांनी घेतला आणि आता आपलेच काही देश बांधव  घेत आहेत, आणि हे सत्य आहे की दुबळी व्यक्ती आणि समाज केव्हाच  स्वतंत्र  नसतात. पूर्वी परक्यांनी गुलाम बनवल आज आपलेच बनवतायत. आपल्या  देशात डझनाहूनही जास्त राजकीय पक्ष असण्याच हेच कारण आहे.

आपल्या विखारी भाषणात काही नेते  मग विशिष्ठ  समुदायाला खुश करण्यासाठी बेताल वक्तव्य करतात पण निषेध करण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही, कारण आपण निर्बल आहोत आणि आपल्यात एकी नाही तेव्हा जागे व्हा देश हितास प्राधान्य द्या समुदायास नाही. 'एकी दाखवा एक व्हा'...

Saturday, 12 April 2014

लागे-बांधे

 सध्या राजकीय वातावरण चांगलाच तापल आहे, प्रत्येक जन एकमेकांची जुनी प्रकरण उकरून काढत आहे. कोणी धार्मिक, कोणी उद्योग जगातील लागेबान्ध्यांची आणि जमल्यास अनधिकृत बांधकामांची.... पण कोणालाही जनतेबद्दलचा विशेष कळवळा दिसून येत नाही.

जुनी प्रकरणे उकरण्या ऐवजी ती वेळीच निदर्शनास आणून होऊ घातलेले गैर व्यवहार का रोखले जात नाहीत? कारण तस साफच आहे दुसरयाकडे बोट दाखवणारा हेही जाणून असतो की उरलेली चार बोटे त्याच्याकडे आहेत विशेषतः राजकारणात तरी...

एकदा का राजकीय निवडणुकीचे रंग उतरले की विविध पक्षांचे तुझ्या गळा माझ्या गळा सुरु... जनतेचे प्रश्न दुय्यम आणि प्रतिनिधींचा वैयक्तिक स्वार्थ प्रार्थमिकता प्राप्त करतो. संसदेतील खासदारांच्या वाढवण्यात आलेल्या भत्त्या संदर्भातील प्रकरण सर्व परिचित आहेच.

अशा वेळी रवींद्रनाथ टागोर यांचे विचार योग्य वाटतात ते असे की "आपणाला जे पाहिजे ते सरकारने लगेच दिले तर सरकार व प्रजा यांच्यात सलोखा निर्माण होईल असे काहींना वाटते, पण एका बाजूने भीक मागणे व दुसरया बाजूने भीक घालणे या गोष्टी संपणार कधी?"

इथे टागोरांना हेच सांगायच आहे की प्रजेने सरकारचे मिंधे न राहता स्वतः हून  पुढाकार घेऊन देश सेवा करावी तरच देशाचा उद्धार होईल. बाकी एक सरकार जाऊन दुसर येईल, हे चक्र सुरूच राहणार... मग काय आपण दरवेळी आशाळभूतपणे कोणा पक्ष किंवा व्यक्तीकडे पाहत राहणार? की जो आपला उद्धार करील....

राष्ट्रात कोणी एक व्यक्ती कधीच हिरो होऊ शकत नाही कारण राष्ट्र निर्माण हे सामुहिक कार्य आहे, कोणा एका व्यक्तीच नव्हे... तेव्हा विचार करा आणि राष्ट्रासाठी मतदान करा कोणा व्यक्ती किंवा पक्षासाठी नव्हे.

Tuesday, 8 April 2014

साधन आणि साध्य

 'धड पड करून शहाणे लोक घरे का बांधतात? पाहुण्याला जेवण देता यावे व वाटसरूला आधार देता  यावा म्हणून.'
                                                                                                                                    - तिरुवल्लुवर

 वरील सदविचार प्रसिद्ध तामिळ लेखक तिरुवल्लुवर  यांचे आहेत. त्यांच्या 'कुरल' या ग्रंथात अंकित केलेला वरील एक विचार, असे अनेक विचार  त्यांनी या ग्रंथात लिहिले आहेत. सध्या वन आणि टु बी एच के च्या धडपडीत माणूस  मरे तोवर कष्ट करतो पण वरील साध्या गोष्टीची यत्किंचित जाणीव हि त्याला नसते.

 जेव्हा साध्यापेक्षा साधन हावी होत तेव्हा माणूस खरया आनंदा पासून दूर होत जातो. म्हणून साधन प्राप्त करा पण साध्य  विसरू नका, आणि हिच शिकवण ज्येष्ठ लोकांनी सांगितली आहे. तेव्हा तीचा आदर करा आणि जीवनाचा  खरा आनंद घ्या.

Sunday, 6 April 2014

असंतोष

असंतोष... एक मानसिक अवस्था. असंतोष दोन प्रकारत विभाजित होऊ शकतो, सकारात्मक असंतोष आणि नकारात्मक असंतोष. सकारात्मक असंतोष  हा स्वकेन्द्री असतो जिथे व्यक्ती स्वतः आणि आसपासच्या वैयक्तिक वर्तुळा संबंधी अधिक सुधारणेच्या हेतूने असंतुष्ट असतो.

याउलट नकारात्मक असंतोष समाज केन्द्री असतो. जिथे व्यक्ती हि समाजाचा भाग बनते आणि सामाजिक सुधारणे संदर्भात असंतुष्ट असते पण या असंतोषाचा एक तोटा असा कि तिथे वैयक्तिक स्वार्थाच विभाजन झाल्याने सुधारणेची भावना टिकात्मक दृष्टीकोन घेतो.

म्हणून सामाजिक असंतोष नाहिसा करायचा असेल तर समाजात राष्ट्र आणि धर्माबद्दल अस्मिता निर्माण करणे आवश्यक आहे. अस्मिता स्वाभिमान जागृत करते आणि स्वाभिमान जबाबदारीची जाणीव निर्माण करतो आणि समाजात सुधारणेची भावना विकसित होते.  


Saturday, 5 April 2014

सत्संग

माणसाला सार्वजनिक जीवनात सत्संग फार महत्वाचा आहे. सत्संग म्हणजे तुमच्या आतील मूळ अध्यात्मिक आणि मानसिक शांततेला आव्हान करण्याची प्रक्रिया.

नेमस्त जीवनात काम आणि घर या दोन बिंदुवरच केलेले आवागमन खचितच मानसिक शांतता देईल, पण एक सत्संग जी उर्जा देईल ती कदाचित तुमच्या अंतरात्म्याला साद घालण्यास पुरेशी ठरेल.

महासत्संग 
परम पुज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या सान्निध्यात 

तारीख : ५ एप्रिल २०१४ 
वेळ : सायंकाळी  ६. ३० वाजता 
स्थळ : बालेवाडी स्टेडियम, पुणे  
आमंत्रण : सार्वजनिक