Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Sunday 4 January 2015

सुबोध लोकमान्य

आज 'लोकमान्य, एक युगपुरुष' हा चित्रपट पाहायला गेलो. प्रतिसाद अपेक्षेहून प्रचंड होता. एकंदरीत मला चित्रपट फार आवडला. ओम राउतचा पहिला चित्रपट असुनही त्याच दिग्दर्शकीय कौशल्य वाखाणण्याजोग आहे. चित्रपटाच निर्मितीमुल्य हि छान आहे, पण एव्हढ्या मोठया चित्रपटाचा डोलारा ज्या व्यक्तीरेखेवर अवलंबुन होता त्या 'टिळकांची' भूमिका ज्या प्रकारे सुबोध भावेने साकारली आहे त्याला तोड नाही, अगदी अप्रतिम.

खर तर मी चित्रपट पहात नव्हतो तर सुबोधच्या अभिनयाच रसग्रहण करत होतो, संपूर्ण चित्रपटात तो कुठेही सुबोध भावे वाटत नाही तो 'लोकमान्य टिळकच' वाटतो. टिळकांसारख व्यक्तिमत्व साकारताना या माणसाने आपली कल्पनाशक्ती किती पणाला लावली असेल याच राहून राहून आश्चर्य वाटत. अभिनयाची नैसर्गिक जाणच नव्हे तर खोली आणि रुंदी काय असते याचा वस्तुपाठच सुबोधने घालुन दिला आहे.

माझ्या मते अभिनयात ८० टक्के आवाज, १५ टक्के डोळ्यातील भाव आणि ५ टक्के प्रसंगानुरूप देहबोली यांचा सर्वस्वी प्रभाव साकारत असलेल्या भुमिकेवर पडत असतो. मग ती काल्पनिक असो वा ऐतिहासिक आणि  इथेच सुबोधच कौतुक करावंस वाटत. त्याने संपुर्ण चित्रपट भर 'लोकमान्य' हि व्यक्तिरेखा साकारताना कुठेही आवाजाचा पोत आणि पल्ला यावरच नियंत्रण हरवु दिल नाही आणि इथेच त्याने लोकमान्यांच्या व्यक्तीरेखेवरील पकड मजबुत केली. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो  मी मिळवणारच' हे वाक्य म्हणजे त्याच्या वाचिक अभिनयाचा उत्कृष्ट नमुना आहे तुम्ही अगदी डोळे बंद करूनहि टिळकांना  (सुबोधला) पाहु शकता.

माझ्यासाठी दुसरी  आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे डोळ्यातील भाव. सुबोधने टिळकांच्या डोळ्यातील भाव कसे पकडले असतील? मला विचाराल तर काल्पनिक व्यक्तिरेखा साकारताना डोळ्यातील भाव व्यक्त करताना रुदन, क्रोध, आनंद, दुःख इत्यादी नेहमीच आव्हानात्मक असतात, पण ऐतिहासिक व्यक्तित्व साकारताना तर असंभवच होतात, कारण लोकांनी  एकतर त्या विवक्षित व्यक्तीच चित्र किंवा छायाचित्र पाहिलं असत आणि त्या व्यक्तीला ते त्या विवक्षित चित्र किंवा  छायाचित्रानुसार त्याच व्यक्तिमत्व 'कस' यापक्षी 'असच' असेल याचा कायमस्वरूपी ठोकताळा मांडतात आणि इथेच खर आव्हान असत लोकांवर छाप पडण्याच आणि सुबोधने हे आवाहन लीलया पेलल आहे. टिळकांच्या डोळ्यातील करारीपणा त्याने हुबेहूब साकारला आहे.

मला राहुन राहून आश्चर्य वाटत, हि तीच व्यक्ती आहे का? जिने बालगंधर्व साकारले! ते हि दोन रुपात एक 'स्त्री' आणि दुसरा 'पुरुष' आणि आता याच व्यक्तीने 'टिळक' साकारले हा नुसता अभिनेता नाही तर जादुगार आहे.
तिसरी गोष्ट देहबोलीची.'एके काळी आपल्या देशातुन सोन्याचा धुर निघत होता, आणि आता या देशाची माती सुद्धा आपली नाही' या वाक्यात 'आणि आता या वाक्यानंतर एक pause घेत हातातली काठी दोन वेळा  जमिनीवर आपटत पुढील वाक्य म्हणण काय, आणि सिंहगडावरील कड्यावर मावळत्या सूर्याच्या साक्षीने दोन्ही हात पसरवत स्वतःला 'devil टिळक' म्हणुन टिळकांची भव्यता दाखवण काय... 'अप्रतिम' या छोट्या- छोट्या गोष्टी पण अतिशय प्रभावी ठरतात.

मला आवर्जून सांगावसं वाटत, कि ज्यांना अभिनयाची जाण आहे किंवा जे अभिनय करू इच्छितात त्यांनी हा चित्रपट एकदा अभिनयासाठी तरी अवश्य पहावाच. सुबोध भावे सारखे कलाकार असतात जे कलाकार होऊ घातलेल्या किंवा अभिनय करू इच्छीनाऱया व्यक्तीला खाडकन जागेवर आणतात आणि अप्रत्यक्षपणे म्हणतात 'मुर्खा याला अभिनय म्हणतात' तुमच दिसण आणि असण यापेक्षा अभिनय हि कला किती मोठी आहे याची जाणीव करून देतात. जे दिलीप कुमारने भूमिकांमधील वैविध्य आणि भावपूर्ण डोळ्यांनी  दाखवलं (असा असामान्य अभिनेता जो कॅमेराकडे पाठ करूनही आपल्या भावना लोकांपर्यंत पोहचवु शकत होता )   जे राजेश खन्नाने अभिनय कौशल्याने  दाखवलं जे अमिताभ ने आपल्या प्रेझेन्स ने सिद्ध केल जे आमिरने आपल्या वैविध्याने आणि शाहरुखने अभिनयातील सहजतेने सिद्ध केल, नाना पाटेकरने अप्रतिम संवादफेकीने सिद्ध केल आणि इतकच नव्हे तर रॉबर्ट डी निरोने आपल्या प्रतिभेच्या उंचीने जे दाखवलं तेच सुबोध भावे हा मराठी कलाकार आणि मराठी सिनेइतिहासातील उत्कृष्ट अभिनेता अभिनय म्हणजे काय हे दाखवुन देत आहे.

सुबोध तुझ्या अभिनय कौशल्याला माझी मनापासुन दाद आहे. तु भविष्यात याहुनहि सर्वोत्तम देशील असा मला विश्वास वाटतो परमेश्वर तुला सहाय्य करो, हिच माझी सदिच्छा...