Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Sunday 4 March 2018

मादीचा जन्म

प्रस्तावना -: माणूस कोणाची आठवण केव्हा काढतो? एक तर जेव्हा ती व्यक्ती जिवंत नसते किंवा ती त्याच्या जवळ नसते.मला एक प्रश्न नेहमी पडतो,जागतिक पुरुष दिन कधीच नसतो पण जगात त्यांच वर्चस्व पदोपदी जाणवतं. कदाचित त्यामुळेच पुरुषांना कोणताही एक दिवस साजरा करण्याची गरज भासत नसावी.पण याउलट महिलांची स्तिथी दिसते.इतरवेळी महिलांना जी वागणुक मिळते त्याचा आढावा घेतला तर महिला दिन साजरा का करतात हे समजते, कारण मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्यांचं अस्तित्वच समाजाने आठवणी पुरतं मर्यादित ठेवलं आहे जे मुळात नाहीच.स्त्री आणि पुरुष समानता तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण त्यांच्यात भेद करणं बंद करू.आज ही जी कविता मी प्रस्तुत करतोय ती नाममात्र कल्पना आहे पण तिचा गाभा हा स्त्री-पुरुष एकतेतच आहे.

                         मादीचा जन्म

अपूर्वकाळी देवाने नर ची निर्मिले होते, दोहो नरातील एक नर प्रिय समंजस होता,सहिष्णुतेचा महिमा तयाचा अपरंपार होता
दुसरा नर शीघ्र कोपी अन चंचल मानी होता,सहोदराच्या सहिष्णुतेचा याने अनर्थ केला अन याच मदाच्या पायी मादीचा जन्म झाला
देवानेही प्रथम नराच्या गुणाला परखून रत्न तया दिधले,परी तयाने अट सांगता पशु-पक्षीही थिजले
"हे बालका आहे हे असामान्य रत्न, करील जे तुझ्या गुणांचे उत्तरोत्तर वर्धन,परी जर तू हे रत्न व्यर्थ गमावशील,पशु-पक्ष्यांसाहित सर्व समजतील तुला पुरुषार्थहीन"
एव्हढे बोलून देव अंतर्धान पावला,अन द्वितीय नराचा मत्सर-द्वेष जागा झाला, अन याच मदाच्या पायी मादीचा जन्म झाला
द्वितीय नराने मग मोहाने रत्न गमन ठरविले,सहोदराला बंधुत्वाच्या शृंखलेत अडकविले,घेऊन ते मग रत्न बंधुत्वाचा अव्हेर केला,अन याच मदाच्या पायी मादीचा जन्म झाला
प्रथम नराला पुरुषार्थहिनतेचा टिळा बसला,पण वर बसलेला विधाता खुदकन गाली हसला,प्रथम नराने देवाला मग आर्तवे केली
"क्षमा करावी पिता झाल्या अपराधासी,बंधुत्वाच्या शृंखलेत मी अडकूनी गेला होतो,भावनेच्या भरात वाहून गेलो होतो,बंधूने जरी अपहरिले रत्न ते मौल्यवान तत्काळ करावा त्या रत्नाच्या गुणांचा अपहार
एव्हढे बोलता देव प्रगट तयापुढे झाला,
"व्यर्थ रुदन नको बालका असे हे विधीलिखित,रत्न गुणाच्या अपहाराचा अधिकार नाही मजला,परी तुझ्या गुणांचा मोह मला झाला, यापरी आता मी तुला नवा जन्म देतो,रत्नाहून ही सुंदर मोहक शरीर तुला देतो,जाता सहोदराकडे तो शरण येईल तुजला रत्न तुला देऊन तो दास बनेल तुझा"
एव्हढे बोलता देव अंतर्धान पावला,अन याच मदाच्या पायी मादीचा जन्म झाला
पाहता स्व शरीराकडे तो (ती) क्षणभर मोहित झाला,अपूर्व सौन्दर्याने तो स्वतः ची विचलित झाला. देवाचे आभार मानूनी तो सहोदराकडे गेला, वर्तवले जसे देवाने आस तसा फिरला,दोघांच्या संयोगाने नवा जीव जन्मला,अन याच मदाच्या पायी मादीचा जन्म झाला
नवरत्नाने मग दोन नरांच्या गुणांचा विस्तार केला,प्रथम नर आता मादी म्हणूनच ठेला,या मादीच्या वंशवेली मग चहूदिशा फिरल्या, रत्नापरी शरीराने स्व-गुण प्रसवत्या झाल्या,अन याच मदाच्या पायी....

                                    - विशाल बळवंत बर्गे

Saturday 13 January 2018

गोड गोड बोला

दुधात चॉकलेट मिसळा आणि दुधाची शक्ती वाढवा! वा काय जाहिरात आहे, जसं काही दूधचं अशक्त आहे.म्हटलं लोकं आजकाल किती पटकन विश्वास ठेवतात अशा जाहिरातींवर.जाऊ द्या मुलं दूध पितील म्हणून आई बाप सुद्धा विश्वास नसला तरी ते प्रोडक्ट घेतात.
आता हाच न्याय जर आपण आपल्या जिभेसाठी वापरला तर?म्हणजे जिभेवर नेहमी चॉकलेट ठेवायची स्वप्नं पाहू नका नाहीतर कॉलेस्ट्रोल वाढायचं.चेष्टेचा भाग सोडला तर जिभेत जशी मुळातच ताकत आहे त्यात आपण जर साखरेचा गोडवा आणला तर किती बरं होईल नाही.छोट्या छोटया गोष्टींसाठी भांडून आपण वर्षातून कितीतरी वेळा तोंड कडू करत असतो आणि निष्पत्ती काय? तर नात्यातही तोच कडवटपणा जो ईच्छा नसतानाही गिळावा लागतो.तसं कोणी जाणून बुजून कोणाशी वैर धरत नाही ही गोष्ट जरी मान्य केली तरी काही काळापुरता अबोला ठीक पण आयुष्यभरासाठी ही भीष्म प्रतिज्ञा घ्यायची तरी कशाला? (पेलवत नसताना) आणि स्वतःला च त्रास करून घ्यायचा.त्यापेक्षा स्वतः च आपलं मन हलक करून समोरच्याशी गोड बोललं तर काय वाईट.भले समोरचा काही बोलला नाही तरी तो गोडवा त्याच्या नाहीतरी तुमच्या हृदयात उतरेलचं की नाही.
मग आज 14 जानेवारी 2018 पासून आपण संकल्प करूया जिभेत गोडवा आणण्याचा कदाचित थोडं अवघड वाटेल पण प्रयत्न तरी करा मग बघा जिभे बरोबरच नात्यांची ताकद कशी वाढते ते!

मकर संक्रातीच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा...तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला😊

                                           - विशाल बळवंत बर्गे

Saturday 6 January 2018

दंगल घडण्यामागची तात्विक मीमांसा

वैश्विकदृष्ट्या पाहायला गेलं तर माणूस हा एक प्राणी आहे. माणूस इतर प्राण्यांपासून यासाठी वेगळा आहे कारण त्याला बुद्धी आहे पण माणूस आणि प्राण्यांमध्ये एक समान दुवा आहे तो म्हणजे भावना.
माणूस वैयक्तिक स्तरावर वैचारिक अथवा बुद्धिशील असतो परंतु संयुक्तरित्या तो भावनाशील उरतो.याचं कारण बहुदा इतरांच्या विचारांशी आपले विचार तो अवलोकन करतो परंतु इतरांचे विचार आपल्या विचारांना धक्का देणारे ठरू लागले तर त्याच्या दोन प्रतिक्रिया निर्माण होतात.एक तर तो इतरांचे विचार धिक्कारतो कारण त्याचा अहंम दुखावतो
दुसरी गोष्ट म्हणजे तो दुसऱ्यांचे विचार स्वीकारून त्यात त्यांना सामील होतो, कारण त्याची स्वतःची विचारांची अस्पष्टता आणि बौद्धिकदृष्ट्या इतरांचे विचार आपल्या विचाराहून योग्य वाटणे.
आता हे मुद्दे विस्ताराने सांगायचे तर, एक असं अवलोकन आहे की बहुतकरून मोठमोठ्या सभांमध्ये होणाऱ्या वक्तव्यांमध्ये समविचारी किंवा समधर्मी समाज एकत्र होतो, त्यांना एकतर वक्त्याच्या विषयामध्ये रुची असते किंवा त्याचे विचार जाणून घेण्यास ते उत्सुक असतात, तर दुसऱ्या प्रकारचे लोक असे असतात जे आधीपासून वक्त्याच्या विषयवस्तुस परिचित असतात आणि त्याचे समर्थन करणारे सुद्धा.
आता उपरोक्त समुदायात लोकांचा रोख वक्त्याच्या 'बुद्धिवादाकडे' (तो त्याच्याकडे असो अथवा नसो) केंद्रित झाल्याने त्यांची वैयक्तिक बुद्धी ही वक्त्याला शरण जाते आणि भावनेला मोकळी जागा मिळते आणि तिथे तिचे बुद्धीशी द्वंद्व होत नाही. एकदा का लोकांची भावना जागृत झाली की वक्त्याचे काम फक्त त्यांच्या भावनेशी खेळण्याचे उरते (तसा वक्त्याचा हेतू असो अथवा नसो) म्हणून बहुतकरून मोठ्मोठ्या सभांमध्ये होणाऱ्या भडकावू भाषणानंतर समाज चेततो किंवा दंगलीस प्रवृत्त होतो. भारतात विशेषकरून उत्सव आणि सभांमध्ये नियंत्रण ठेवावे लागते, कारण अशा ठिकाणी बुद्धी शरण जाते परंतु भावना चंचल असतात त्यामुळे त्या शरण जात नाहीत.बुद्धी जेव्हा शरण जाते तेव्हा श्रद्धा निर्माण होते जी कोणत्याही सिद्धांत,मत,विचार किंवा धर्माबद्दल असू शकते.श्रद्धेतून निर्माण होते धारणा, धारणेतून निर्माण होतात विचार आणि विचारातून निर्माण होते कृती. म्हणून कोणताही नवीन विषय किंवा विचार जाणून घेण्याआधी धारणा किंवा पूर्वग्रहांना तिलांजली देणं आवश्यक आहे.

                                          - विशाल बळवंत बर्गे