Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Sunday 26 January 2014

प्रजासत्ता

आज २६ जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिवस. भारतातील नागरिकांना या दिवशी राज्यघटना मंजूर करुन खरया अर्थाने लोकशाहीचा मार्ग मोकळा करण्यात आला.

पण ६५ वर्षात लोकशाहीतुन भारतीय जनतेला कितपत फायदा झाला ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हुकुमशाही किंवा राजेशाही पद्धतीत एकाधिकार सर्व मान्य असतो परंतु लोकशाहीत जनतेच राज्य असत असे म्हणतात, पण यात कितपत तथ्य आहे?

अर्थात लोकशाही निर्विवादपणे सर्वात जास्त न्याय्य पद्धति आहे. पण तेव्हा, जेव्हा ती चालवणारे वैयक्तिक आकांशा आणि स्वार्थ बाजुला सारून जनतेच्या हिताला प्राधान्य देतील तेव्हा. जर जनतेलाच नजरअंदाज केल तर ती फक्त लोकशाहीच्या बुरख्या आडची हुकुमशाही ठरू शकते.

दुर्दैवाने भारतात लोकशाही नामधारी होण्याच्या वाटेवर आहे कारण भ्रष्ट लोकप्रतिनिधींचा सुकाळ आहे. जर आपण मतदार या नात्याने सदविवेकबुद्धीचा वापर करुन फक्त  योग्य उमेदवाराला निवडून दिल तरच आपण आपल्यासाठी खरया अर्थाने लोकशाहीचा मार्ग प्रशस्त करू शकू.  जय हिन्द!      

Saturday 25 January 2014

बदली नको बदल हवा....

श्रीकर परदेशी यांच्या बदलीसाठी सध्या लोकप्रतिनिधींकडून जोरदार प्रयत्न चालु आहेत आणि त्यांची बदली सध्या जवळ जवळ निश्चित समजली जात आहे.

बदलीचे कारणही भलतच विचित्र आहे ते म्हणजे कुठल्याही प्रकारच्या अनधिकृत कामावर त्यांच्या तर्फे होणारी आडकाठी साहजिक आहे जर लोकप्रतिनिधींकडूनच अस वर्तन होत असेल आणि त्यांना कुठल्या अधिकारयाचा त्रास(?)होउ लागला तर ते काय नाही करू शकत?

पण इथे मुद्दा आहे जनता जनार्दनचा त्यांच म्हणण काय आहे हे तर जगजाहिर आहे, बर्याच वर्षानंतर त्यांना एक ईमानदार जन अधिकारी (आयुक्त) भेटला आहे आणि त्याच्या सडेतोड निर्णयावर आणि कायदेशीर वागण्यावर जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे. तर इथे त्यांच्या प्रतिनिधींचा(?) खलल बिलकुलच समजण्यासारखा नाही.

आयुक्तांची बदली रद्द होण्यासाठी खरतर आंदोलनाचीही गरज नाही, पण मनमानी कारभाराला सरावलेल्या आणि आपण जनतेचे फक्त प्रतिनिधी आहोत हे विसरलेल्यांना जाग आणून देण्यासाठी कदाचित हे पाउल ही उचलाव लागेल.

आणि अस आंदोलन झालच तर ते तथाकथित लोकप्रतिनिधींसाठी फक्त एक चेतावनी असेल कारण जनतेलाही 'आप' ल हित कशात आहे हे चांगलच समजल आहे.    

Friday 24 January 2014

अनुवंशिकता

सध्या मता मतांचा गलबला फार वाढला आहे. प्रत्येकाचा एकाच प्रश्नावर वेगवेगळा दृष्टिकोण आढळून येतो. अस म्हणतात माणसावर अनुवंशिकतेचा परिणाम फार असतो, त्यामुळेच कदाचित अस होत असाव.

तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथेत याचा उल्लेख अतिशय सुरेख शब्दात एका अभंगातून केला आहे;

पहा हो देवा कैसे जन। भिन्न भिन्नसंचिते।।१ ।।
एक नाही एका ऐसे। दावी कैसे शुद्ध हीन ।।२।।
पंचभूते एका राशी। सुत्रे कैसी ओळखावी ।।३ ।।
तुका म्हणे जो जे जाती। त्याची स्तिथी तैशी ते ।।४ ।।

वरील  अभंगातून आणखी एक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे शेकडो वर्षांपूर्वीही माणसाची वृत्ति आजच्याहुन काही विशेष भिन्न नव्हती.पांडुरंग हरी.… पांडुरंग हरी..

Thursday 23 January 2014

कायद्याच बोला

दिल्लीचे कायदा मंत्री सोमनाथ भारती यांना हटवण्याची मागणी सध्या विरोधी पक्ष आणि मीडिया कडून जोरावर आहे, कारण १५ जानेवारी रोजी त्यांनी जमावाला बरोबर घेऊन दिल्लीस्थित युगांडाच्या मुलनिवासी महिलेच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला केला.

इथे आरोपात तथ्य आहे अथवा नाही हा भाग अलाहिदा पण मुख्य प्रश्न असा आहे कि त्या महिलेच्या घरावर छापा टाकण्याची गरज का पडली? कारण ती महिला ड्रग रैकेट चालवत होती आणि हे भारतातील उघड़ सत्य आहे कि अफ्रीकी देशातून आलेले नागरिक अथवा विद्यार्थी सम्भवतः ड्रग्स डीलिंग मधे सक्रिय आहेत.

मग प्रार्थमिकतेचा रोख सोमनाथ भारती नसून ती महिला हवी. तिच्याकडे ड्रग्स सापडले असतील तर तिच्यावर कारवाई व्हायला हवी. असल्या वर- वर च्या वादात स्कूप शोधण्यापेक्षा मीडिया ने मुळ मुद्द्याला हात घालायला हवा कारण देशाची मुळ समस्या करवाईचे स्वरुप नसून कारवाईस दिरंगाई हा आहे.

राहता राहिला प्रश्न महिला आयोगाचा, त्यांनीही आपण कोणाचा स्टॅंड घेत आहोत याचा विचार करणे आवश्यक आहे एका अबला आणि निराधार महिलेची बाजू घेणे वेगळ तसेच परदेशातील बेकायदेशीर घडामोडीत लिप्त महिलेची बाजु घेण वेगळ हे त्यांना समजायला हव फ़क्त ती महिला आहे म्हणून.... या मुद्द्याला अर्थ राहत नाही.

तसेच गोव्यात बेकायदेशीर रित्या राहणारया अफ्रीकी निवासींवर कारवाईचा बडगा उगरताच त्यांनी केलेल्या दंगलींचे उदाहरणही ताजेच आहे. तेंव्हा 'आप' ल्यातीलच एका ईमानदार व्यक्तीला टार्गेट करण्यापेक्षा परदेशातील गुन्हेगारांवर (महिला असली तरी) कारवाई करण केव्हाही श्रेयस्कर.

Wednesday 22 January 2014

आंदोलनात गैर काय?

'आम आदमी पार्टी' सध्या चौफेर टिकेचे धनी होत आहेत, पण ही टिका किती वास्तविकतेला धरुन आहे याचा विचार होने आवश्यक आहे.

दिल्ली ही देशाची राजधानी असल्याने ती केंद्र सरकारच्या अधीन आहे. न्याय आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असे पोलिस खातेही त्यांच्याच अधीन आहे. परंतु यातून एक नुकसान देह गोष्ट पुढे येत आहे ती म्हणजे पोलिस यंत्रणेची अरेरावी.

जर पोलिस यंत्रणा आजपर्यंत केंद्र सरकारच्या अधीन होती तर त्यांना दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीवर चाप का बसवता आला नाही? आणि आज जेव्हा आप सरकार दिल्लीत स्थापन झाले आहे तर त्यांना पोलिस यंत्रणेकडून योग्य सहाय्य का होत नाही?

जर राजधानीत कोणताही गुन्हा होत असेल तर त्याची अप्रत्याशित जबाबदारी मुख्यमंत्र्यावर येत असेल तर त्याला विवक्षित यंत्रणेवर अधिकार नको? असे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांचे त्वरित समाधान मिळावे या हेतुने जर आंदोलन होत असेल तर त्यात गैर काय?

उलट आजही जर राजधानीतील मुख्यमंत्र्याला आपल्या अधिकारासाठी आंदोलन कराव लागत असेल तर ते स्वतः किती हतबल आहेत हे दर्शवत......

Tuesday 21 January 2014

श्रद्धा

खर तर मनुष्याचा  स्वभाव धर्म 'आसरा'(Shelter) शोधण्याचा आहे. सामाजिक प्राणी असल्याने त्याला एकटेपणाच भय वाटत. आपल्याहुन उच्चतम शक्तीला तो शरण जाउन तो तिला आपलेसे करू पाहतो, तिला स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहतो. सामूहिकदृष्ट्या 'मूर्तिपूजा' हे त्याच एक उत्तम उदाहरण आहे.

श्रद्धा अखिल मनुष्य जातीच शक्तिस्थान आहे. गोष्टी मना विर्रुद्ध घडत असताही श्रद्धा जगण्याच पुढे जाण्याच धैर्य देते. पुरानातील एकलव्यने एका मातीच्या पुतळ्याला गुरु मानून ग्रहण केलेली अद्भुत धनुर्विद्या हे श्रद्धेचे एक उत्कृष्ट उदहारण आहे.

वास्तविक ती त्याची स्वतःवरीलच श्रद्धा होती परंतु ती त्याने द्रोणाचार्यांच्या पुतळ्यामधे वर्ग केली हाच तो शरणागत भाव. श्रद्धा 'कर्ता' भाव न घेता पुढे चालण्याच बळ देते आणि त्यामुळेच श्रद्धावान व्यक्तीस यश -अपयश पचवण्यास मदत होते.

Monday 20 January 2014

समर्पण भाव

वैज्ञानिक दृष्टिकोण असलेला मनुष्य श्रद्धेवर कदाचित विश्वास ठेवणार नाही, कारण श्रद्धा म्हणजे जी वस्तु किंवा चैतन्य अस्तित्वात आहे किंवा नाही याबद्दल भौतिक जगात द्विधा असू शकते अशा गोष्टींवर पूर्णपणे विसंबून राहणे किंवा समर्पण करणे.

जिथे वैज्ञानिक दृष्टिकोण आहे तिथे समर्पण बिल्कुलच ग्राह्य धरल जात नाही. कारण ते कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण भाव जाणून घेण्यास उत्सुक असतात आणि त्या गोष्टीच्या अस्तित्वाची खात्री पटल्यावरच ते विश्वास ठेवतात.

जस की एखाद्या आस्तिकच्या दृष्टीने ईश्वर आहे ही श्रद्धा एका नास्तिकाच्या दृष्टीने अंधश्रद्धा ठरते. तस पहायला गेल तर दोघांनीही ईश्वर पाहिला नाही परंतु एकात समर्पण भाव आहे तर दुसर्यात नाही.

Sunday 19 January 2014

पूर्णातील पूर्ण

माणसाला पूर्णत्वचा हव्यास फार, कोणतही कार्य किंवा गोष्ट जोपर्यंत पूरणत्वस जात नाही तोवर त्याला समाधान लाभत नाही. मग तो त्या कार्यातच अशा प्रकारे अडकतो कि त्या कामातून आनंद घेणच तो विसरुन जातो.

आणि शेवटी जर का ते कार्य पूर्नत्वास गेल नाही तर तो निराश होतो, हतबल होतो, स्वतः ला नाहीतर नशिबाला कोसत राहतो आणि स्वतः च अवमूल्यन करू लागतो. पण तो अनादिकालपासूनच वैश्विक सत्य विसरतो जे हजारो वर्षांपूर्वी वेदात ग्रंथित केल आहे ते म्हणजे सर्व काही पूर्णच आहे.

मग कशाला व्यर्थ चिंता..... कामापेक्षा कामातील आनंद महत्वाचा. कारण शेवटी मुक्कामापेक्षा प्रवासातील मजा काही वेगळीच.

"ते सर्व प्रकारे पूर्ण आहे. हे पूर्ण आहे. कारण त्या पूर्णातुनच पूर्ण उत्पन्न झाले आहे. पूर्णातुन पूर्ण काढून घेतल्यावर पूर्णच शिल्लक राहते."  (वैदिक प्रार्थना )

Saturday 18 January 2014

स्वयंशासित गर्दी

काल रात्री बोहरा समाजातील धर्मगुरूंच्या अंतिम संस्काराला आलेल्या लोकांमधे अचानक कोलाहल माजून अठरा लोक मृत्यु पावले. 

भारतात घडलेली अशी ही एक मात्र घटना नाही या आधीही काही महिन्यापूर्वीच झारखण्ड भागात एका तीर्थ स्थळावर पुल तुटल्याच्या अफवेने शेकडो लोकांचा बळी घेतला तसेच मांढरदेवी दुर्घटना ही काही विशेष जुनी नाही पण आजतागायत अशा घटना घडतच आहेत.

भारत हा उत्सव प्रिय देश आहे आणि इथे छोट्या मोठ्या उत्सवात गर्दी फार होते, अशा वेळी गर्दिवर नियंत्रण ही सरकारची प्राथमिकता हवी. फक्त गर्दिवर नियंत्रण ठेवणारया भरमसाठ पथकाऐवजी शास्त्र शुद्ध रित्या प्रशिक्षित थोड्याच लोकांचे पथक जास्त कारगर ठरेल. तसेच अशा घटना घडण्यामागील प्रमुख कारण म्हणजे 'अफवा'.... यावर आळा घालणे खरतर अवघड गोष्ट आहे, यासाठी लोकांच्यातच अशा गर्दीच्या ठिकाणी स्वयंशिस्त गरजेची आहे.

कारण गर्दिवर एकवेळ नियंत्रण ठेवता येऊ शकत पण तिला काबूत ठेवणे प्रचंड अवघड आहे यासाठी लोकांनीच अशा गर्दीच्या ठिकाणी अफवेला थारा देऊ नये हा अशा प्रकारच्या घटनेवरील रामबाण उपाय आहे.

Friday 17 January 2014

भावाचे भुकेले

सर्वोच्च न्यायालयाने शेवटी पंढरपूरच्या विठठल मंदिरातील बडवे आणि उत्पात यांची मध्यस्थी आणि हक्क काढुन घेत सरकारकडे वर्ग केले.

निश्चितच हा एक चांगला संकेत आहे पण परंपरागत बडवे जाऊन त्यांच्या जागी सरकारी बडवे येऊ नये म्हणजे समस्त वारकरयाना खरया अर्थाने विठठल पावेल.

तस पहायला गेल तर ही फार जुनी परंपरा आहे पण  परंपरेचे पाईक म्हणजे आजचे उत्पात आणि बडवे यांनी जर कालानुरूप पाउले उचलली असती तर कदाचित ही वेळ टळु शकली असती.

आपल्या समाजातही असेच राजकीय मध्यस्त आहेत जे जनतेच्या विकास आणि प्रगति रूपी देवाला भेटु देत नाहीत, मंदिरातील बडवे गेलेत आता ह्यांची वेळ आली आहे.

तस पाहिल तर देव आणि जनता हे नेहमीच भावाचे भुकेले असतात यांची जो चांगल्या भावाने सेवा करतो तो खरा भक्त तो खरा नेता.

बोला पुंडलिक वर्दे हरी विठठल..........श्री ज्ञानदेव तुकाराम........   

Thursday 16 January 2014

ढ-सा-ळ नामे

नामदेव ढसाळ खरतर 'यांच्या' बद्दल काही अधिकाराने मी बोलू शकत नाही पण आदर जरुर करतो अवतरणातील टिंब त्याचा सज्जड पुरावा आहे.

कॉलेज मध्ये असताना 'सामना' त येणारे त्यांचे लेख वाचायचो (प्रयत्न करायचो)विशेष समजायच अस नाही पण कुतूहलाने वाचू जरुर वाटायच.

त्यांची लेखन शैली खुपच वेगळी होती उसन्या बुद्धिमत्तेचा तसुभर अंश नाही आणि वाचकावर प्रभाव पाडण्यासाठीचा सूक्ष्म अहंकारी दर्प.

त्यांची कविताही अशीच अनाकलनीय

त्यांची सनातन दया
'त्यांची सनातन दया फ़ॉकलैंड रोडच्या भडव्याहुन उंच नाही
खरच त्यांनी आपल्यासाठी आभाळात मांडव घातला नाही
बोलून चालून ते सामंतशहा त्यांनी तिजोरीत लॉक केलेला प्रकाश
लादलेल्या पडीबाज आयुष्यात फुटपाथ देखील आपली नाही'
(गोलपीठा, नामदेव ढसाळ )

त्यांच्या जाण्याने काही वेगळ झाल अस वाटत नाही पण एव्हढी जाणीव होते, कोणी तरी 'मोठा माणुस' गेला लोक त्यांना 'विद्रोही' म्हणायचे......

'विद्रोही' हे अवतरण त्यांच्या भोवती आणखी किती शतके राहिल सांगता यायच नाही अगदी त्यांच्या कवितेसारख पण राहिल एव्हढा मात्र खर मराठी साहित्यात आणि जनात.....

Wednesday 15 January 2014

'आप' ला पाठिंबा.....

'आम आदमी पक्षाने' फ़क्त दिल्लीच जिंकली नाही तर लोकजागृतिही फार मोठ्या प्रमाणावर केली आहे, याचा भरभक्कम पुरावा आजच्या 'सकाळ' वर्त्तमान पत्रात पहिल्याच पानावर आहे.

आतापर्यंत जनतेने उपलब्ध पर्यायातून उमेदवार निवडून दिले पण आता त्यांना भ्रष्टाचार मुक्त यंत्रणेची आवश्यकता भासु लागली आहे. याचा सबळ पुरावा म्हणजे लोकांनी आघाडीचे दोन पक्ष वगळता तीसरा पर्याय म्हनुन 'आप' ला पसंती दिली आहे.

इथे 'आप' च महिमा मंडन करण्याचा प्रयत्न नाही, पण 'आप' मुळे प्रस्थापित राजकीय यंत्रणा आणि मानसिकता यांना धक्का दिला आहे. ज्यामुळे त्यांच्यात एव्हढी तरी जाणीव व्हावी की जर त्यांनी लोकभावनेचा आदर केला नाही तर त्यांच्या राजकीय करकिर्दीचा अंत निश्चित आहे.

Tuesday 14 January 2014

कलिधर्म

सध्या वादग्रस्त विधानान्चा सुकाल पाहता हिन्दु पुरानातील एक गोष्ट  आठवते जेव्हा कलि काळ आला तेव्हा कलिला विचारण्यात आल, कलियुगात तु लोकांवर कोणत्या शस्त्राने राज्य करशील तेव्हा कलिने एका हातात 'जीभ' घेतली आणि दुसरया हातात 'लिंग' आणि म्हणाला या दोहोंणी. 

आणि आश्चर्यकारक रित्या आज आपण याची सत्यता पाहतोय एक बाजूला मोठ मोठ्या हस्ती यौन उत्पीडनासारख्या  गंभीर गुन्ह्यात अडकल्या आहेत तर दुसरया बाजुला  प्रथेप्रमाणे राजकीय नेत्यांनी जिव्हा नियंत्रण सोडल आहे.

मला आश्चर्य वाटत ते याच की शेकडो वर्षांपूर्वी या हृषिन्ना येणारया काळाची पावले अचुकपणे कशी ओळखता आली? की पुऱानोक्त चार विविध युगात लोकांचे स्वभावधर्मही बदलतात? काही जरी असल तरी आता पुरोगामी म्हणवनार्यांनी सुद्धा कलिधर्माचा अभ्यास करायला हवा.  

 

Monday 13 January 2014

अजुन लहानच (?)

काल बरयाच  दिवसातून  शाळेतल्या मित्रांनी पिक्चरला जाण्याचा प्लान केला, पण तिकीट बुक केल रात्री पाउने अकराच्या शोच उत्साहाच्या भरात मी सुद्धा येण्याच कबूल केल.

वडिलांना एक कैजुऍ लिटि म्हणून विचारल तर सख्त नकार..... "जायच तर दिवसा जा, एव्हड्या रात्री नाही" पुढे काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता.

मी पुन्हा मित्राला फ़ोन केला आणि माझ तिकीट cancel  करायला सांगितल....... "मी सहा तिकीट बुक केलित, आधी सांगायला काय झाल....... एव्हढया रात्री आणखी कुणाला adjust करणार....... ब्ला.... ब्ला..... ब्ला

तात्पर्य : वडील आणि मित्रांच्या दृष्टीने मी अजुन लहान आहे........

Saturday 11 January 2014

'आप' ल भविष्य 'आप' ल्या हातात

काल महराष्ट्रातल्या आम आदमी पक्षाच्या (आप) सभासद नोंदणीस प्रारंभ झाला ही मोहिम राबवण्यामागचा मुख्य हेतु हा काही फक्त समर्थन मिळवण्याचा नसुन लोक भावनेचा कल आजमावण्याचा आहे.

बेलाशक 'आम आदमी पक्ष' हा नविन पक्ष असला तरी तो लोक भावनेचा आदर करणारा पक्ष आहे, हे माझ वैयक्तिक मत असल तरी ते दृढ आहे. दोन दिवसांपूर्वी जेव्हा मी आपच्या संघटकांना भेटलो तेंव्हा त्यांनी मला पक्षाच्या स्थापनेमागील मुख्य हेतु सांगितला आणि तो मला पटलाही पण कुठल्याही पक्षाच यश अपयश त्या पक्षाच्या ध्येय धोरणांवर अवलंबून असत म्हणून कोणताही निर्णय घेण्याआधी मी पक्षाच्या वेबसाइट वर भेट दिली.

वेबसाइट वर 'व्हिजन' या टॅब अंतर्गत 'कि अजेंडा आइटम्स' वाचले तेव्हा मला पक्षाची साफ प्रतिमा दिसून आली जी प्रत्यक्षात उतरल्यावर लोकांच कल्याण करेल ते चार 'कि अजेंडा आइटम्स' असे
  1. जन लोकपाल बील 
  2. नकाराधिकार (Right to Reject)
  3. पुनः प्रत्यक्षाधिकार(Right to Recall)
  4. राजनैतिक केंद्रविघटन (Political decentralization)
    जन लोकपाल बील : भ्रष्टाचार विरोधी एक प्रावधान ज्यामधे भ्रष्ट अधिकारयांवर फास्ट ट्रॅक कोर्टात सहा महिन्याच्या आत शिक्षेची तरतुद.

 नकाराधिकार (Right to Reject) :जर मतदानाला उभा राहिलेला कोणताही उमेदवार लायक वाटत नसेल तर मतदान यंत्रावर शेवटी रिजेक्ट ऑल हे बटन असेल.

पुनः प्रत्यक्षाधिकार(Right to Recall) : जर निवडून दिलेला उमेदवार भ्रष्ट निघाला तर सामान्य जनतेला इलेक्शन कमीशन ला तक्रार करुन पुनः निवडणूक घेण्याचा अधिकार असेल त्यासाठी पाच वर्ष थांबन्याची गरज नाही.

 राजनैतिक केंद्रविघटन (Political decentralization) : थोडक्यात सांगायच तर लोकाभिमुख यंत्रणा ज्यामधे कोणत्याही महत्वपूर्ण निर्णयात लोकांचा सहभाग.

(वरील माहिती फारच थोडक्यात सांगितली आहे तरी विस्तारपूर्वक माहितीसाठी aamaadmiparty.org या वेबसाइट ला भेट दया )

वरील मुद्दे आणि पक्षाची धोरणे मला पटली म्हणून मी आज पक्षाचा भाग आहे तुम्हीही होउ शकता.....

सभासद नोंदणीसाठी 
भेट दया aamaadmiparty.org  किंवा
मिस्ड कॉल करा 07798220033

Friday 10 January 2014

अंताची सुरुवात

प्रत्येक गोष्टीला अंत आहे कारण तीची सुरुवात झाली होती. मग ती चांगली असो वा वाईट तस नसत तर चांगली माणस अमर झाली असती.

रावणाचा अंत झाला तसा राम राज्याचाहि, फरक इतकाच कि रामाच फक्त राज्य गेल पण हजारो वर्षात लोकांच्या मनातुन राम काही गेला नाही.

अंत कितीही कठोर असला तरी तो सर्वांना जाणीव करून देतो कि तुझी इच्छा असो वा नसो तुला थांबाव लागेल, पण तुझा शेवट कसा असेल यावर तुझ यश अवलंबून राहिल.

रावण गेला पण तो राक्षसत्वात निमाला आणि राम ही गेला पण तो देवत्व पावला, फरक अंतात होता आणि यश ही  अंतातच

आजही एका अंताची सुरुवात होतेय आणि येणारया सुरुवातीलाही अंत असेल, पण फरक शेवट कसा होतो हे ठरवेल.......  

Thursday 9 January 2014

टॅक्स विरहित प्रशासन

सध्या रामदेव बाबांच टॅक्स विरहित प्रशासनिक मॉडेल चांगलच चर्चेत आहे. खरतर त्यांनी डायरेक्ट आणि  इंडायरेक्ट टॅक्सच्या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी एक सुचारु आणि सुविहीत संकल्पना मांडली आहे जी नक्कीच प्रशंसनीय आहे.

पण काल एका न्यूज़ चैनलवर यासंदर्भात जेंव्हा चर्चा झडत होत्या तेंव्हा या संकल्पनेच खंडन करण्याकडेच अधिकांश कल होता. तिथे एक अर्थशास्त्री होते, मुख्य संपादक, कर विशेषज्ञ आणि आपले पुण्याचे दिपक करंजीकरही होते ज्यांनी एक वेगळी संकल्पना मांडली होती. या चर्चा सत्रातून फलस्वरूप काही निष्पत्ति तर झाली नाही पण एक सामाज्ञ विचारसरणी पुन्हा जगजाहिर झाली आणि ती म्हणजे प्रोत्साहना ऐवजी टिकेची.

खर तर अशा चर्चासत्रांमधून चर्चा या सकारात्मक असाव्यात तिथे असा टॅक्स लागू होन शक्य आहे कि नाहि यापेक्षा, टॅक्स संदर्भातील मुळ ढाच्यामधे इतक्या वर्षात काही अपवाद वगळता बदल का झाले नाहीत? का टॅक्स सरलीकरण झाल नाही? यासंदर्भात टॅक्स डिपार्टमेंट कडुन काही संशोधन झाल आहे का? इत्यादी मुद्दे उपस्तिथ व्हायला हवेत पण ते झाले नाही.

रामदेव बाबांची टॅक्स विरहित प्रशासनिक संकल्पना तांत्रिकदृष्टया योग्य आहे कि नाही हा भाग अलहिदा, पण त्या संकल्पनेला विचार न करता टाळण हे सुद्धा चुकीचे ठरेल. शेवटी प्रत्येकाला आयुष्य आणि टॅक्स सरळ- साधे-सोपे असावे अस वाटत, जरी ते नसले तरी :)     

Wednesday 8 January 2014

आर्ट ऑफ़ लिव्हिंग

श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ़ लिव्हिंग तर्फे घेण्यात येणारया बेसिक कोर्स चा काही वर्षांपूर्वी मी भाग होतो आणि या ६ दिवसीय कार्यशाळेत सुदर्शन क्रिये बरोबरच सुखी जीवनाच्या पंचसूत्री सांगण्यात आल्या त्याच महत्व त्रिकालबाधीत आहे....

1) विरोधाभास एकमेकांना पूरक आहेत
(सुख- दुःख, रात्र- दिवस, युद्ध- शांतता)

2) परिस्तिथीचा आहे तसा स्वीकार करा
(पाउस आला म्हनुन चीड़-चीड़ करण्यापेक्षा छत्री घेऊन बाहेर पडा, हीच बाब व्यक्तींबाबत ही लागु करा )

3) अहंकार सोडा
(अहंकार तुमच्यातील सुप्त दिव्य गुण व्यक्त करण्यात अडचण निर्माण करतो )

4) क्षमा करा
(ज्याप्रमाणे चुक झाल्यावर आपण स्वतःला क्षमा करतो तसेच इतरांनाही क्षमा करा, लोकांना सुधारण्याची संधी दया )

5) वर्तमानात जगा
(भूतकाळात रमने आणि भविष्याची चिंता करणे या दोन्ही गोष्टी वृथा आहेत म्हणून वर्तमानात जगा आनंदी रहा)  



Tuesday 7 January 2014

निघंटरत्नाकर दिनचर्या

काहि दिवसांपूर्वी निघंटरत्नाकर हा फार जुना आयुर्वेदिक ग्रंथ वाचनात आला त्यात बरयाच रोग आणि ज्वरांची सम्पूर्ण माहिती आहे

आयुर्वेदामधे मनोवृत्तीचा सम्बन्धही आजाराशी जोडला जातो ज्याला आपण मनो शारीरिक विकार म्हणतो म्हणून माणसाची वृत्ति आणि वर्तन कस असाव याची महितीही  ग्रंथात दिली आहे त्यातीलाच हा थोडासा अंश

निघंटरत्नाकर दिनचर्या

साधु व दृष्ट यांच्याशी मैत्री करावी त्या मधून साधूंशी तर सर्वदा करावीच व संसर्ग उत्त्तमांशी ठेवावा
(साधु म्हणजे सज्जन आपल्यासारखे (?) )

आपल्या घरी आलेल्या अतिथीला विन्मुख पाठवू नये
(न बोलवता आला तरी)

कोणाचाही अपमान करू नये आणि सर्वदा विनययुक्त राहावे
(अमिताभ बच्चन आदर्श रोल मॉडेल )

गुरुजवळ पाय पसरून वेडे वाकडे बसू नये
(आजच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य )

कोणी आपल्यावर अपकार केला असताही आपण त्यावर उपकारच करावे
(वाचून अजीर्ण झाल असेल तर हाजमोला खा )

आपले शत्रु व मित्र आणि आपण कोणाचा द्वेष करतो व अपमान हे हि कोणाजवळ सांगू नये
(आजकल सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात अवघडच पण प्रयत्न जरूर व्हावा )

लोकांचे अंतः करण जाणून जो जसा संतुष्ट होईल तसे वागावे व मी एक सुखी असे मानू नये
( डेल कार्नेजी ची पुस्तके वाचा)

तळटिप : कंसातला मजकुर मुळ ग्रंथातील नाही:)

Monday 6 January 2014

'इस्रो'

'भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र' (Indian Space Research Organisation) ज्या प्रकारे अंतराष्ट्रीय स्तरावर भारताच नाव उज्वल करत आहे, त्यावरून अस अनुमान निघु शकत की भारताला इतर संयुक्त राष्ट्रे फ़क्त एक प्रगतिशील राष्ट्र म्हणूनच ग्राह्य धरु शकत नाही तर त्यांना जाणीव करुन देतो की भारत अद्यायवत तंत्रज्ञानात   अर्थपुर्ण भूमिकाही बजाऊ शकतो.

डॉक्टर विक्रम साराभाई, ज्यांना आपण भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे जनक मानतो त्यांनी १९६९ साली केलेल्या भाषणात विदीत केल होत की,"आमच्यासाठी ध्येयाप्रती कोणतीही द्विधा अवस्था नाहीये. चंद्र किंवा इतर ग्रहांवरील मोहिमा अथवा मानवी अंतरिक्ष उड्डाण याकरिता आर्थिक दृष्टीने पुढारलेल्या देशांशी स्पर्धा करण्याचा आमचा कोणताही हेतु नाही. पण आम्हाला विश्वास आहे की जर आम्हाला राष्ट्रीय आणि संयुक्त राष्ट्रीय दृष्टया महत्वपूर्ण भूमिका बजवायची असेल, तर आम्हाला काहीच नाही तर दुसरया स्थानावरून  मानवीय आणि सामाजिक अडचणीसाठी आधुनिक तंत्र ज्ञानाचा अंमल करावा लागेल."

२०१३ सालच 'मार्स ऑर्बिट मिशन' आणि आताच्या 'जी एस एल व्ही डी ५' या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर असलेल्या प्रक्षेपकाचे यशस्वी उड्डाण हे दोन अवकाशीय कार्यक्रम डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या भाषणाला पृष्टि देतात तसेच 'मानव जातीच्या सेवेसाठी अवकाश तंत्रज्ञान' या 'इस्रोच्या' बोधवाक्याला ही जागतात. भारताच्या राजकीय उलथा-पालथीत संशोधन प्रकल्पांची अशी स्थिरता आणि प्रगति निश्चितच प्रशंसनीय आहे.

Sunday 5 January 2014

व्यक्ति केंद्री

सध्या भारतीय राजकारणात पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी दोन व्यक्ति चांगल्याच केंद्रस्थानी आल्या आहेत सांगण्याची आवश्यकता नाही राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यात भर म्हणून मीडिया ने अरविन्द केजरीवाल यांनाही या व्यक्ति केंद्री युद्धात सामिल केल आहे.

भारतीय राजकरणाची आणि पर्यायाने लोकशाहीची ही फार मोठी शोकांतिका आहे, इथे लोक तत्वांऐवजी व्यक्ति पूजतात म्हणूनच इथे आमदारचा मुलगा/मुलगी आमदार होतात, मोठ मोठ्या पक्षांचे वारस संस्थापकांच्या घरातलेच असतात भलेही त्यांना अनुभव असो वा नसो मग लोकशाहीला अर्थच काय?आणि सामान्य लोकांना संधि मिळणार तरी कधी?

इथे राजकीय नेत्यांना दोष देण्यात अर्थ नाही आपल्यालाच आपल्या विचारसरणीत बदल करावा लागेल आपली निष्ठा नेहमीच तत्वांशी असावी व्यक्तीशी नव्हे कारण  व्यक्तिंमधे स्वार्थ आढळतो तत्वांमधे नाही तत्व मग ती भलेही कोणत्या का पक्षाची असेनात उमेदवार निवडतानाही तो कोणाचा यापेक्षा काय आहे याला महत्व देण्यात याव.

वर सांगितल्याप्रमाणे संधी मिळणार नसेल तर आपल्याला ती निर्माण करावी लागेल, का म्हणून आपण आपल्यातल्याच एखादया ईमानदार नेतृत्वाला संधी देऊ नये भलेही मग तो अपक्ष का असेना, मग तो उमेदवार कोणी का असेना, प्रत्यक्षात तुम्हीही... हो, हा ब्लॉग वाचनारे तुम्ही. अलबत राजकरणा ऐवजी समाजकारण करणार असाल तर...

 

Saturday 4 January 2014

खर जनलोकपाल

कालच्या बातम्यांमधे राजकारण्यांचा हवाई उड्डाण आणि सरकारी निवास स्थांनांवरील वार्षिक खर्च दाखवण्यात आला, आणि तो लाखांच्या घरात होता. एव्हढा खर्च की सामान्य जनतेला अशा जीवनाचा हेवा वाटावा.

प्रत्येक राज्यातील मंत्र्यांच्या खाजगी ताफयांवर आणि त्यांना देण्यात येनारया सुरक्षा यंत्रणेवर ही चर्चा झडल्या पण उपयोग काय अशा चर्चांचा? कारण जोपर्यंत अशा अवास्तव खर्चांवर नियंत्रण ठेवणारी ऑडिट यंत्रणा स्वयंशासित आणि सरकारी नियंत्रणाच्या बाहेर जात नाही तोपर्यंत अशा नियमबाह्य खर्चावर आळा घालणे अवघड आहे.

प्रत्येक व्यक्तीला स्वार्थ आणि अरेरावी पासून दूर ठेवण्यासाठी नियंत्रणाची आवश्यकता असते आणि अस नियंत्रण राज्यकर्त्यांवरही असाव पण ते नाम मात्र असू नये. 'लोकपाल बील' अशा नियंत्रणाची गरज पूर्ण करते पण ते राज्यकर्त्यांच नसून सामान्य जनतेच असाव तरच ते खर जनलोकपाल होईल.

Friday 3 January 2014

आपली अस्मिता

आपल्या इथे एक मानसिकता सर्रास पहायला मिळते ती म्हणजे 'चलता है'. सिग्नल तोडला चलता है, कचरा पेटीच्या बाहेर फेकला चलता है, रस्त्यावर थुंकला चलता है... ही यादि आणखीही बरीच मोठी आहे पण तूर्तास एवढेच, तो मुख्य मुद्दा नाही.

मुद्दा आहे मानसिकतेचा,या मानसिकतेचे मूळ काय? आणि ती का आहे याचा, माइ-या मते तरी 'अस्मितेचा' अभाव. कदाचित आश्चर्य वाटेल एव्हढया लहान गोष्टीत कसली आली आहे अस्मिता? पण आपण १५ ऑगस्ट दिवशी अस्मितेने भारले असताना 'भारत माझा देश आहे' असे अभिमानाने म्हणतो तीच अस्मिता आपण या लहान-सहान गोष्टीत का दाखवत नाही, जर मी माझ घर स्वच्छ ठेवतो तर मी रस्ता, कचरा पेटी इथे का म्हणून घान करावी हि सुद्धा आपलीच मालमत्ता आहे.…

ही 'अस्मिता' हे 'माझ' पण आपण फक्त बोलुन नाही तर व्यवहारिकतेत उतरवुया आणि आपल्या घरा बरोबरच आपला देशही स्वच्छ ठेउया...

Thursday 2 January 2014

आप आए बहार आयी...

'आम आदमी पार्टीचा' (आप ) इफेक्ट जाणवेल हे माहित होत पण इतक्या लवकर याची कल्पना नव्हती, आज सकाळच्या बातम्यांमधे याचे परिणाम प्रत्यक्षात पहायला मिळाले.

राजस्थानच्या मुख्यमंत्री सरकारी निवासस्थान नाकारतात तर इकडे छत्तीसगढ चे मंत्री महोदय आपल्या मंत्री गणांना भ्रष्टाचाराशी निपटनयाचे आदेश देत आहेत आणि सर्वात कडी म्हणजे स्वतः कॉंग्रेसचे एक नेते वीज दर कमी केले नाहीत तर स्वतःच्याच पक्षा विरुद्ध आंदोलनाचा इशारा देत आहेत.

एका अर्थी आपच्या इफेक्ट मुळे प्रस्थापितांना खडबडून जाग आली आहे, हा इफेक्ट असाच कायम राहो हिच प्रार्थना... बाकी आम आदमी पार्टीसाठी म्हणावस वाटत 'आप आए बहार आयी...'  

Wednesday 1 January 2014

कुणी - काय - केल्यावर....

कुणी ,

अपमान केल्यावर- दुसर्यांचा करू नये

पाय खेचल्यावर- प्रोत्साहन द्यावे

शिक्षा दिल्यावर- क्षमा करावी

कपट केल्यास- संधी द्यावी

उद्धट वागल्यास- नम्र राहव

रागावल्यावर - स्मित कराव

रडल्यावर वर - हसवाव

वर सांगितल्याप्रमाणे,

जमल तर - कराव

नाहीतर - जरूर कराव......:)