Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Monday 31 March 2014

सत्यशोधक - ६

काळाच्या शक्तिच मापन

काळाच्या प्रवाहाच सोदाहरण स्पष्टीकरण दिल्यानंतर काळाच्या शक्तिच मापन हा प्रश्न गौण राहणार नाही. काळ हा अनादी स्वयं पूर्ण असल्यामुळेच त्याच्या या गुणधर्मातच अखिल ब्रह्मांडाच्या व्युत्पत्तीचे सार आहे. ते असे कि काळ प्रवाही होता आणि आहे म्हणूनच विश्वाची व्युत्पत्ती झाली व भविष्यातील व्युत्पत्तीचे कारणसुद्धा काळच राहील.

जर हा काळ प्रवाही नसता तर अखिल ब्रह्मांडाची व्युत्पत्ती झालीच नसती, कारण काळ जर आपण स्थिर कल्पिला तर त्याच्यात चळवळ कशी होणार? चळवळी मुळेच कार्य होते व कार्यातून कारण आणि शेवटी आश्चर्यकारक इतिहास निर्माण होतो. सांगायचा मुद्दा हा की काळाच्या प्रवाहीपणाच्या गुणधर्मामुळेच चळवळ निर्माण झाली आणि त्या चळवळीचा परिणाम म्हणजे ब्रह्मांडाची व्युत्पत्ती.

 थोडक्यात सांगायच तर काळ हा शक्तीच्या परेय आहे. तो काल होता, आजही आहे, उद्याही राहील आणि शुन्यातही त्याच अस्तित्व कायम राहील. टिक... टिक.... टिक....

Sunday 30 March 2014

सत्यशोधक - ५

काळाच्या अमर्यादित शक्तीचा दाता कोण ?

मागील प्रकरणाच्या स्पष्टीकरणानंतर हा प्रश्न तसा व्यर्थ आहे. काळाच्या शक्तीला कोणीही दाता नाही उलट काळातूनच शक्ती प्रस्तुत होते व त्यामुळेच काळाच्या शक्तीचा कोणी दाता नसून काळ हाच शक्तीचा दाता आहे. चार प्रकरणांच्या सम्पुष्टीनंतर  वाचकांच्या मनात एक प्रश्न आला असेल कि या लेखमालेत काळालाच कोणत्याही व्युत्पत्तीचा पाया का मनाला आहे?

तर उपरोक्त शंकेचे समाधान असे कि, तुम्ही अशी कल्पना करा कि अखिल ब्रह्मांडात काहीही नाही म्हणजे असतील नसतील तेव्हढे ग्रह, तारे, सूर्य, चंन्द्र व इतर अनेक लहान मोठे घटक एव्हढेच नव्हे तर ब्रम्हांडाच अस्तित्वच काही काळाकरीता बाजूला ठेवा तुम्हाला अस्वस्थ करणारी पोकळी अथवा पोकळी हि संज्ञाहि जिथे फिकी पडेल असे जे काही जाणवत आहे ह्या अवस्थेतच आपण काळाच अस्तित्व समजू शकतो. पूर्वी सांगितल्याप्रमाणे काळ हा प्रवाही आहे.

आता हि प्रवाहीपणाची गोष्ट नीट स्मरून त्या अवस्थेतच विचार करा कि आपण ज्या अवस्थेत आहोत तेथेही काळ प्रवाही आहे तो थांबलेला नाही कारण तो प्रवाही आहे म्हणूनच पुढे अखिल ब्रम्हांड निर्माण होणार आहे व त्या ब्राम्हंडात अगणित तारे, तारका, ग्रह, सुर्य, चंद्र व त्या अनुषंगाने परिस्तिथी व पोकळी यांच्या संयोगाने निर्माण होणारया हवा, ध्वनी, प्रकाश इत्यादी कार्यकारणिक गोष्टी निर्माण होणार आहेत.

वरील अवस्थेच्या अनुभवानंतर एक गोष्ट लक्षात आली असेल कि जेव्हा आपण काही नाहीची कल्पना करतो तेव्हासुद्धा काळ प्रवाही असतो. त्या शिवाय का आपण अस म्हणू शकतो कि मी हा अनुभव घेतला, कारण अनुभव घेते वेळीसुद्धा जो काही तुमचा काळ निघून जातो तोच काळाची साक्ष पटवून देण्यास समर्थ आहे. म्हणूनच काळ हा सदैव व निरंतर प्रवाही आहे व त्याला आदी, मध्य व अंत नाही आणि त्यामुळेच काळ हा समस्त  सृष्टीचा आद्यकारण आहे .

Saturday 29 March 2014

सत्यशोधक - ४

जो स्वतः  स्वयंपूर्ण आहे ज्याला कोणत्याही प्रकारच बंधन नाही व ज्याच्या प्रत्येक हालचालीत सामर्थ्य आहे व ज्याच्यामुळे शक्तीला शक्ती हे संबोधन आहे तो हा काळ. आणि काळाचे सामर्थ्य हेच की काळ हाच शक्तीचा कारक आहे.

याच सोदाहरण स्पष्टीकरण अस की, आपण निसर्गाच्या सानिध्यात असता जेव्हा  मंद सुगंधीत हवेचा झोका जाणवतो तेव्हा त्या सुगंधाच रहस्य आपण तत्काळ ओळखतो व ते कारण म्हणजे फूल. कारण  फुलामुळे सुगंध आहे सुगंधामुळे सुगंध नाही.

बोध असा की फुलातच सुगंध प्रसवायच सामर्थ्य आहे, तद्वतच काळातच शक्ती प्रसवण्याचे सामर्थ्य आहे कारण शक्तीमुळे काळ नव्हे तर काळामुळे शक्ती आहे.

Friday 28 March 2014

सत्यशोधक - ३

काळाला नियमाचे बंधन का नाही?

काळ हा जर नियामातीत असेल तर त्याला प्रवाहीपणाचा नियम का लागू होतो? असा प्रश्न बहुतेकांना जरूर पडला असेल. तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये नाकाद्वारे श्वास घेऊन तो तोंडा वाटे सोडतो. हि क्रिया नियम नसून ती जगण्यासाठी आवश्यक अशी वृत्ती अथवा गरज आहे व गरज हि कधी नियमांनी बाध्य होत नाही.

वरील उदाहरणाद्वारे आपल्याला समजलेच असेल की काळाचा प्रवाहीपण हे नियम बद्ध नसून ती एक स्वाभाविक वृत्ती आहे.

Thursday 27 March 2014

सत्यशोधक - २

नियम 

काळाचा नियम सांगण्याआधी नियमाचा इष्ट अर्थ सांगणे योग्य ठरेल ;
" मोठ्या अथवा लहान स्तरावर भौतिक अथवा आदिभौतिक रहाटगाडे सुरळीत चालण्यासाठी, त्या स्तरावरील जीवांसाठी जी बंधने घातली जातात अथवा असतात त्याला नियम असे म्हणतात. "

वरील नियमाची व्याख्या पाहता काळाला  नियम लागू होत नाही हे स्पष्ट होते. कारण या ठिकाणी आपण काळ हि वस्तु (भौतिक) गृहीत न धरता एक विषय (*आस्तिक्य) म्हणून पहात आहोत. आणि या आधी स्पष्ट केल्याप्रमाणे काळ हा भौतिक व आदिभौतिक विश्वाचा कारक आहे व त्यामुळे नियम व बंधनातीत आहे.
खरे पाहता नियम हा *मायेचा अविष्कार आहे.





*आस्तिक्य : भौतिक कक्षेत न येणारी पण अस्तित्वात असणारी किंवा जाणवणारी 
* माया :        गृहीतकांवर आधारित गोष्ट (अध्यात्मिक अर्थ नाही) किंवा जी गोष्ट मुळात नसते पण मानतात. (माया *सापेक्ष असते)
 *सापेक्ष :      व्यक्ती परत्वे बदलणारे एकाच विषयाचे आयाम

 

Wednesday 26 March 2014

सत्यशोधक - १

प्रस्तावना 

सत्य हे सदैव अविचल आहे. सत्य हे काळाचेच एक अविचल आणि प्रवाही स्वरूप आहे. होय, काळ... काळ हाच ईश्वर आहे, समस्त ब्रम्हांडाचा नियंता आहे. संपूर्ण ब्रम्हांडात जेव्हा काही अस्तित्वात नव्हते एव्हढेच नव्हे तर स्वयं ब्रम्हांड सुद्धा अस्तित्वात नव्हते तेव्हासुद्धा हा काळ अस्तित्वातच होता. आणि तो नुसता अस्तित्वात नव्हता तर तो प्रवाही होता.

काळाच्या प्रवाहामुळे ब्रम्हांड निर्माण झाले, ग्रह निर्माण झाले, अगणित तारे, सुर्य, चंद्र, त्या ग्रहांवर अस्तित्वात असलेले अगणित लहान-मोठे-सुक्ष्म जीव निर्माण झाले.चक्रावून सोडणार अमर्यादित कल्पनातीत विश्वसुद्धा काळाचच एक अंग आहे.

काळ हि गोष्ट व्याखेत कैद करण्याइतपत जरी सोपी नसली तरी थोडक्यात सापेक्ष दृष्टीकोनातून काळाची व्याख्या अशी होऊ शकते ;
" जो अनादी आहे व साहजिकच अनादी असल्यामुळेच जो अनंत आहे व जो प्रवाही आहे तसेच नियम व बंधनापलीकडील असून जगत्कारण आहे तो काळ होय "

Tuesday 25 March 2014

कालाय तस्मै नमः

 दिनांक २३ जून २००७, वार शनिवार. या दिवशी मी काळ या विषयावर तात्त्विक आणि चिंतनात्मक विवेचन लिहायला सुरुवात केली, पण ते विवेचन पूर्णतः वैयक्तिक व माझ्या बुद्धीच्या मर्यादेत तसेच वाचन, पूर्व निरीक्षण आणि अनुभव या सर्वांच ते एक संचित होत.


उद्यापासून या ब्लॉगवर ते 'सत्यशोधक' या मथळ्याखाली  क्रमवार प्रसिद्धीस येईल. या लेखमालेला चिंतनात्मक स्फुट असेही म्हणू शकता. या आधीच्या विचार आणि कृती यावर आधारीत लेख मालेनंतर हा माझा दुसरा प्रयत्न. आशा आहे या आधीच्या लेखमाले प्रमाणे याच स्वागत होईल.

बाकी काळच प्रत्येक प्रश्नाच उत्तर देतो आणि देईल फक्त आपल्या हृदय आणि बुद्धीची कवाडे सतत उघडी ठेवा. तोपर्यंत, कालाय तस्मै नमः.....

Monday 24 March 2014

जमाव

जमाव क्रोधच नाही तर आत्यधिक आनंदात हि हिंसक बनू शकतो. दोन तीन व्यक्तींचा पुढाकार जो चुकीच्या गोष्टींसाठी का असेना इतर अनेक जणांना चेतवतो.

जमावाची विचार प्रक्रिया बौद्धिक नसून भावनिक असते. त्यामुळेच जमावाला अक्कल नसते असे म्हणत असावेत. दंगल, समूह हत्या आणि सामुहिक बलात्कार सारखे गंभीर तर रेगिंग सारखे प्रार्थमिक स्तरावरील किरकोळ गुन्हे इत्यादी या सामरिक मानसिकतेचे प्रतिक आहेत.

अशा परिस्तिथित समाजातील कोणतीही व्यक्ती सापडू शकते. अशावेळी प्रत्येक व्यक्तीने आप आपली सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवली तर होणारे अनर्थ टळू शकतात. मग तुम्ही अत्याचारी गटातील एक असा अथवा पिडीत.

होत असलेली घटना चुकीची आहे हे लक्षात आल्यावर त्यातून स्वतः तर बाजूला व्हाच पण आपल्या सहकारयांना हि परावृत्त करा. 

Sunday 23 March 2014

अहिंसेच तत्वज्ञान

महात्मा गांधींना सर्वजण एक अहिंसा प्रधान नेता मानतात. अहिंसा म्हणजे कोणावरही  शारीरिक किंवा   शाब्दिक प्रतिहल्ला न करणे किंवा कोणी एका गालावर मारल्यावर दुसरा गाल  पुढे करणे, हे आणि अस बरच काही....

पण महात्मा गांधींना अभिप्रेत अहिंसा हि अशीच होती का? अहिंसा हि भीरु वृत्ती दर्शवत नाही का? किंवा मग शांतता स्थापित करण्यासाठी निर्माण केलेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेला सुद्धा स्वतंत्र सैन्य दलाची गरज का भासते? इत्यादी प्रश्न कदाचित आपल्या मनात येत असतील.

स्वातंत्र्य पूर्व काळात भारतात दोन गट होते, जहाल आणि मवाळ. जहाल हे गरज पडल्यास हिंसेचे हि समर्थन करायचे, तर मवाळ हे  शांततापूर्ण मार्गाने प्रश्न  सोडवण्यावर विशेष भर द्यायचे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे चंद्रशेखर आझाद यांच्या जहाल गटातील होते. आणि हिंसेचे समर्थन करताना भगतसिंग यांनी त्याला स्व-बचाव हे विशेषण दिल.

जर मी म्हणालो, महात्मा गांधींना अभिप्रेत अहिंसा तत्वज्ञानाला भगत सिंग यांच तत्वज्ञान पुरक किंवा समर्थनीय आहे तर.... कदाचित हे विधान विपर्यस्त वाटेल, पण दुर्बळ व्यक्तीच्या अहिंसेपेक्षा सबळ व्यक्तीची अहिंसा केंव्हाही श्रेष्ठ किंवा याच अर्थाने दुर्बळ व्यक्तीची हिंसा हि सबळ व्यक्तीच्या हिंसेपेक्षा समर्थनीय आहे हे खर अहिंसेच तत्वज्ञान.  

 खोलात जाऊन सांगायचं तर ज्याच्याकडे सत्ता आहे त्याने आपल्या सत्तेचा उपयोग न्यायासाठी करावा ना कि जोर जबर्दस्तीसाठी आणि जो निर्बल किंवा जन सामान्य आहे त्याने अन्यायाविरुद्ध दंड थोपटणे हे अहिंसे इतकच समर्थनीय आहे.

म्हणून आज आपण जेव्हढे महात्मा गांधी, विनोबा भावे यांना मानतो तेव्हढेच भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनाही. आज २३ मार्च शहिद दिवस. आजचा ब्लॉग भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या सर्व जहाल आणि मवाळ क्रांतीकारकांना समर्पित. जय हिंद......

Saturday 22 March 2014

गांधारी

हमारा हाथ आम आदमी के साथ, परिवर्तन, तरक्की इत्यादी...  इत्यादी... आणि बरच काही. ऐन लोकसभा निवडनुकीपुर्वी दिसणाऱया स्व-बखान छाप जाहिराती पाहून तहान लागल्यावर विहीर खोदने म्हणजे काय याचा प्रत्यय येतो.

आश्वासन देणे आणि जनतेच्या  भावनेशी खेळणे जणू राजनीतीचा भाग बनला आहे. आचार संहितेला तीलांजली देऊन एकमेकांवर राजकीय कुरखोडी आणि चिखलफेक करणे हे सुद्धा काही नवीन राहिल नाहीये. पण या सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे भारतीय राजकारण, समाजकारण न राहता निव्वळ सत्ताकारण बनल आहे.

ज्या देशात शेकड्याने नुसते पक्षच आहेत तिथे स्वार्थीपणाचा कडेलोट होणे साहजिकच आहे, आपली प्रतिमा किती स्वच्छ आहे हे दाखवण्याकरता कोणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याला हाताशी धरतात तर कोणी गरीबांचे स्व घोषित वाली होतात. सगळा फार्स... ब्रेंडीगसाठी आटापिटा.... जनतेला समजत नाही अशातला भाग नाही, पण गांधारी सारख अंधत्व आपण ओढवून घेतल आहे.

धृतराष्ट्राच्या जागी सरकार आहे जे नैतिक दृष्ट्या अंध आहे, जे बड्या कॉर्पोरेट हस्ती  उघडपणे देश नागवतायत हे पाहूनही पाहू शकत नाही. आणि सगळ्यात मोठी विडंबना हि कि देशाची लाज राखयाला ठेवलेली कृष्ण रुपी शासन यंत्रणा कलंकित नेत्यांनी गुलाम बनवली आहे.

या सर्व परिस्तिथित अमुलाग्र बदल घडवून आणायचा असेल तर नागरी आणि राज्य विषयक ढाच्यामध्ये योग्य बदल करायला हवा त्याच पुनर्रमुल्यांकन व्हायला हव, हि आपल्या देशाची गरज आहे. मुळ जनलोकपाल विधेयकात याला पुरक बरेच मुद्दे आहेत आणि ते पारित झाल्यावर देशातील बरयाच समस्यांचे मुळापासून उच्चाटन होऊ शकते.... डोळ्यावरची पट्टी काढायची हिच योग्य वेळ आहे.  



 

Friday 21 March 2014

कधी आपण

कधी आपण, ठरवतो एक होत दुसर
विचारतो एक, उत्तर मिळत तीसर
प्रयत्न करतो तीन तीनदा, यश मिळत चौथ्यांदा
सांगितल जरी चारवेळा, समोरचा ऐकतो पाचव्यांदा
कधी आपण, सोडणार आयुष्य मोजायच
कधी आपण, शिकणार आयुष्य जगायच
आकड्यांचा खेळ आयुष्यभर पाठ सोडत नाही,
मेल्यावरही मोक्ष आपल्याला 'दहाव्या' शिवाय लाभत नाही....

Thursday 20 March 2014

मी माझे मला


दिवस रविवार. आळसावलेली सकाळ एका मित्राला फोन.....

"कसा आहेस मित्रा?"

"मी मजेत"

"आपण बरेच दिवस भेटलो नाही भेटायच...."

"अरे माझ्या मित्रांबरोबर बाहेर चाललोय"

"ठिक आहे पुन्हा भेटू"

"अरे एक मिनिट.... मला तुझी बाईक मिळेल? आपल भेटण पण होईल.... कस?"

???????????

"बोल ना!"

"मी  बाईक दिली असती पण माझे बाबा ओरडतील मला माफ कर"

(पलीकडून फोन कट )

Tuesday 18 March 2014

सुख पाहता....

 सुख पाहता जवापाडे। दुःख पर्वता एवढे 
अनुरणीया थोकडा। तुका आकाशाएवढा 
बुजगावणे चोरा । रक्षणासे भासतसे 
मनाच्या तळमळे । चंदन ही अंग पोळे 
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदू ऐसे  

-संत तुकाराम

Monday 17 March 2014

जो होली सो होली

 भारत हा सण आणि उत्सव यांचा देश म्हणतात. पण हे उत्सव फक्त उत्सवच नसतात तर त्या मागेही फार मोठे गर्भीथार्थ आणि पौराणिक कथा यांच अजब मिश्रण असत.

जस कि 'होळी'. पौराणिक कथेनुसार प्रल्हाद जेव्हा होलीकेच्या  मांडीवर बसुन अग्नीत प्रवेश  करतो तेव्हा होलीका वरदान असूनही जळून खाक होते पण प्रल्हाद भक्तीच्या बळावर तरुन जातो. याचाच अर्थ असाही घेतात कि द्वेषमूलक वृत्ती प्रेमाने भस्मी भूत करता येते.

म्हणून जुने वाद आणि अहंकार सोडून 'जो होली सो होली, अब खेले रंगोली' म्हणत जेव्हा आपण आपल्या शत्रूला हि जवळ करतो तेव्हा खरया अर्थाने आपण होळी आणि रंगोस्तव साजरा करतो.  तुमच्याहि आयुष्यात वैरभाव विरहित, आनंदी वातावरण कायम रहाव हि शुभेच्छा!  

 

Sunday 16 March 2014

बळीराजाचा बळी

मराठवाडा,विदर्भ या ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरयांच जे आतोनात नुकसान झाल आहे ते पाहून कोणाचहि हृदय पिळवटून निघेल.

मुलाबाळा प्रमाणे जपलेली पिक जेव्हा एका दिवसात आडवी  होतात तेव्हा त्या शेतकऱयाला काय वाटत असेल? ज्या पिकांच्या भरवश्यावर त्याने बँकेतून लाखांनी कर्ज घेतल असत ते फेडण्याची विवंचना तर  असतेच, पण त्याहूनहि ती निसर्गा समोरची हतबलता काळीज कुरतडणारी असते.

मग अशा  स्तिथीत तो आत्महत्येचा मार्ग  पत्करतो.काही दिवसांनी सरकार शेतकऱयाच कर्ज माफ  करते, पण तोपर्यंत एका प्राणाची आहुती पडली असते. मग त्याच शेतकऱ्याचा मुलगा आपल्या कुटुंबासाठी नवी सुरुवात  करतो, आणि त्यासाठी जेव्हा तो पुन्हा बँकेची वाट पकडतो तेव्हा त्या चक्राची नांदी पुन्हा चाहूल देऊ लागते.

सरकार....! आता तरी जागे व्हा. अनुदान द्या..... हे दान नाही, हक्क आहे शेतकऱयांचा. त्यांना सहानुभूती नकोय.... संरक्षण हवय....बळीराजाचा बळी जातोय तो थांबवा.   

Saturday 15 March 2014

चाणक्य नीती

आज आपण आपल्या समाजात एक गोष्ट सर्रास पाहतो. ती म्हणजे सत्ताधारी आणि अधिकारी व्यक्तींची अरेरावी. त्यांच्या समजुती नुसार त्यांना अडवणारे कोणी नसत. हि स्तिथी काही आजचीच नाही तर फार पुरातन आहे .

चाणक्य नीतीत आर्य चाणक्यांनी याच फार सुंदर उदाहरण दिल आहे;

'समाजात सशक्त  व्यक्तीचे अनुचित कार्य  हि उचित  समजल जाते.  आणि निम्न स्तरावरील दुर्बल व्यक्तीचे उचित कार्य सुद्धा दोष युक्त दिसून येतात. जसे राहु  दैत्याने अमृत पान करणे हेच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरले.'

यातील शेवटची ओळ बरच काही सांगून जाते....


Thursday 13 March 2014

शस्त्र आणि वाद

जगातील ११५ देशांपैकी १५ प्रमुख अण्वस्त्रधारी देश आहेत.भारतातर्फे १९८८ दरम्यान अण्वस्त्रबंदीचे प्रथमोच्चरण पंतप्रधान राजीव गांधी यांनी केले.परस्पर संवादातील कमतरता व एकमेकांबद्दल वाटणारी भीती हि अण्वस्त्र निर्मितीची प्रमुख कारणे आहेत. अमेरिका व रशिया हि अण्वस्त्र निर्मितीत अग्रणी आहेत.

उपरोक्त दोन्ही देश अनुक्रमे भांडवलशाही व साम्यवादी असे कट्टर आहेत. व यातूनच दोन्ही देशात कितीतरी  दशके शीतयुद्ध चालू होते या दोन्ही देशांमध्ये जगातील प्रमुख देश आपल्या बाजूने ओढण्यासाठी धडपड चालू आहे यातूनच कितीतरी देशात वैचारिक दुफळी निर्माण झाली आहे.

एक गट साम्यवादी तर दुसरा कम्युनिस्ट तर तिसरा मार्क्सवादी. या प्रत्येक वादानेच संपुष्टात येणारया पक्षांच्या पायाशी वैचारिक क्रांती आहे, विचारवंत आहेत. परंतु लोक हे विसरतात कि विचारवंताचे विचार हे त्यांच्या बौद्धिक क्षमतेशी सुसंगत असतात व त्या विचारावरही त्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टीचा प्रभाव पडत असतो.

यातूनच ज्या लोकांना ज्या विचारवंताचे विचार  पटतात ते लोक एखादा गट स्थापन करतात व आपल्या विचारवंताचाच उदो उदो करतात. त्यांचा इतर जनतेच्या भावविश्वाशी कोणताही संबंध नसतो. म्हणजे आजकाल समाजाचे आयाम बदलले आहेत पण संदर्भ मात्र तेच राहिले आहेत.

पूर्वी धर्माच्या नावाने तंटे होत आता वैचारिक तंटे होत आहेत. यातील प्रत्येक गोष्टीचा निकाल फक्त एका तटस्थ पंचाद्वारे होतो आणि तो म्हणजे शस्त्र ज्यांना कोणतीही जात धर्म नसते किंवा नैतिकतेची बंधने नसतात.आल्या तारखेला होणारे हिंदू-मुस्लिम दंगे काय किंवा काल परवा झारखंडमध्ये झालेले माओवादी अतेरीक्यांचे हल्ले काय यांची पाळेमुळे इतक्या खोलवर आहेत.      

Wednesday 12 March 2014

हर शाख पे उल्लु...

सध्या राजकीय पक्षांमध्ये तिकीट वाटपा संबंधात जे महाभारत सुरु आहे त्यातून आपल्या सारख्या मतदारांना बोध घेण्यासारख बरच काही आहे.

'तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे' हा वाकप्रचार अशावेळी आयाराम गयाराम उमेदवारांना चांगलाच लागू होतो. हे जे बहु प्रतिष्ठित उमेदवार ज्यांनी मोठ- मोठाली पदे भूषवली असतात ते त्यांच्या प्रभागातील जनतेच्या बळावर आपल्या पक्षाला हि आपला दास बनवू इच्छीतात.

पूर्वी कधी पक्षाचा झेंडा मिरवणारे हेच उमेदवार जेंव्हा तिकीट वाटपामुळे नाराज होतात तेव्हा त्यांची पक्ष निष्ठा कुठच्या कुठे विरून जाते आणि ते साळसूदपणाचा आव आणत बंडाचा झेंडा उभारतात आणि दुसरया पक्षात सामीलही होतात.

पण त्यांच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांच्या मनः स्थितीचा होणारा विचार ते करतात का ? पक्षाच्या तत्वाला बांधील राहुन त्या उमेदवारासाठी राबणाऱया लोकांपुढे कोणता पर्याय राहत असेल याचा विचार ते करतात का? नाही ना... जेव्हा  पक्षापेक्षा उमेदवार किंवा नेता मोठा होतो तेव्हा नेहमी अशीच स्थिती निर्माण होते.

तेव्हा मित्रांनो तुम्ही कोणत्या का पक्षाचे असा, पक्षाच्या तत्वाशी बांधील राहा उमेदवाराशी नाही. कारण तत्व नेहमी तशीच राहतात पण माणसे बदलतात. तेव्हा सावधान... राहता राहिला प्रश्न दल बदलू उमेदवारांचा, ते तर आपण दररोज त्यांच्या कोलांट्या उड्या टीव्ही चैनल वर पहातच आहोत ते पाहुन हटकून एक शेर आठवतो ;

बर्बाद गुलिस्तां करने को तो एक हि उल्लु काफी था
यहां हर शाख पे उल्लु बैठा है अंजाम- ए-गुलिस्तां क्या होगा?  

Tuesday 11 March 2014

प्रतिबंध

याआधीच्या परिस्तिथी आणि विचार यांच्या अनुषंगाने लिखित ब्लॉग चा मूळ हेतु सामाजिक अपराधामागील शास्त्र सांगण्याचा होता.

परिस्तिथीची प्रतिकूलता किंवा अनुकूलता आणि त्या अनुषंगाने येणारे विचार आणि विचारा प्रमाणे कृतीसाठी अग्रेसर होणारी मानवीय वृत्ती यांचा व्यवस्थित ताळेबंद मांडून अभ्यास केला असता अस लक्षात येईल कि मानवीय मनोवृत्ती सामाजिक दृष्ट्या अनियंत्रित असली तरी तिला वळण लावून तिच्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकत.


 सामाजिक  अपराधांच्या निरसनासाठी प्रतिबंधात्मक उपायच रामबाण ठरू शकतात. यासाठी आवश्यक आहे शालेय स्तरावर विदयार्थ्यांना (भावी नागरिक) मानसिक प्रशिक्षण देण, ज्यामध्ये अंतर्भाव होऊ शकतो ;

  • आंतरिक शांतता 
  • भावना हाताळणे 
  • सहानुभूती /आदर इत्यादी मुल्ये 
  • परिस्तिथिचा स्वीकार 
सध्या शाळांमध्ये मूल्यशिक्षण हा विषय असेल तर तो थियरोटिकल न राहता जास्तीत जास्त तो प्रक्टीकल व्हावा आणि सर्वात महत्वाच म्हणजे  मूल्यशिक्षणाची जबाबदारी शाळांपेक्षाही कुटुंबाची आणि पालकांची आहे याच भान ठेवण. 
 

Monday 10 March 2014

कृती

कृती हि व्यक्त आणि अव्यक्त घटनांची साखळी असते. विचारांची लवचिकता आणि ताठरता परिस्तिथिचि अनुकूलता आणि प्रतिकूलता ठरवू शकते. अशांततेत विचार तरंगांची ताठरता व्यक्तीच्या विचार शक्तीत शिथिलता निर्माण करते.

याउलट शांततेत विचारांच्या कक्षा फैलावून सृजनशीलता निर्माण होते. एकंदरीत सामाजिक अपराधाचा गाभा आहे;
  • आंतरिक शांततेचा अभाव 
  • वैचारिक ताठरता 
  • परिस्तिथिचि अस्वीकार्यता 
(हा विषय पूर्ण समजण्यासाठी पुन्हा एकदा प्रतिकूलता, अनुकूलता आणि विचार हे या आधीचे भाग वाचा उद्या या शृंखलेतील शेवटचा पाचवा ब्लॉग प्रस्तुत होईल)
 

Sunday 9 March 2014

विचार

 माणसाचा विचारांवर ताबा असतो कि विचारांचा माणसावर? किंवा विचार माणसांना घडवतात कि माणूस विचारांना? प्रश्न थोडे गुंता गुंतीचे वाटतात जसे कि 'पहले मुर्गी या अंडा?'

माणूस मुलतः विचारांचा उर्जा स्त्रोत आहे तो स्त्रोत नेहमीच प्रवाही असतो. म्हणूनच कदाचित हे निरीक्षण नोंदवल गेल असाव कि एका दिवसातील जवळपास निम्मे विचार हे अनावश्यक असतात.

परंतु खर पाहता  विचारातील आवश्यकता आणि अनावश्यकता व्याक्तीसापेक्षच आहे. अनावश्यक विचारांवर जास्त विचार करणारया आणि आपले मनोस्वास्थ्य बिघडवनारया व्यक्तींना मनोरुग्ण म्हणतात तर आवश्यक  विचारांवरच  विचार  करणारयांना सामान्य म्हणतात.

पण या  न्यायाने लेखक आणि  समीक्षकांना मनोरुग्ण म्हणायला हव. कधी-कधी वेग वेगळया विचारतरंगांवर ब्लॉग लिहिताना मलासुद्धा मी मनोरोगी असल्याचा भास होतो... असो, पण समाजाला आज सामान्यांपेक्षा अशाच मनोरुग्णांची आवश्यकता आहे.

शेवटी वेड्याच पांघरून घेऊनच राज दरबारातील विदुषक राजाला योग्य मार्गावर आणायचा. आज तेच विदुषक विदुषी झाले आहेत. आणि समाजाला योग्य मार्गावर आणत आहेत.



    

Saturday 8 March 2014

अनुकूलता

अनुकूलता ही सुद्धा व्यक्तीसापेक्ष आहे. एकांगी अनुकूलता प्रतिकूल विचारतरांगासाठी आकर्षण केंद्र ठरू शकते. (परंतु प्रत्यक्षात एकांगी अनुकूलता सम असते )

प्रतिकूल विचारतरंग आकर्षित होण्याच कारण आहे मत्सर. द्विअंगी अनुकूलता कुरखोडीचा अभाव दर्शवते म्हणजे शांतता.

शांततेतून उदभवलेले विचारतरंग इतर सृजनशील कृतींकडे अग्रेसर होतात. सृजनशीलता शांततेचा गाभा आहे आणि अनुकूलतेचा गाभा बदलणारे विचारतरंग किंवा लवचिकता आहे. 

Friday 7 March 2014

प्रतिकूलता

परिस्तिथी सम असते. परंतु व्यक्ती सापेक्षतेवर तिची प्रतिकूलता आणि अनुकुलता अवलंबून असते. प्रतिकूलता दोन्ही बाजूने असेल तर युद्ध घडत आणि एका बाजूची प्रतिकूलता अपराध निर्माण करते.

एकांगी प्रतिकूलता सामाजिक स्तरावर नुकसानकारक ठरते. तर द्विअंगी प्रतिकूलता राष्ट्रीय स्तरावर घातक ठरते. एकांगी प्रतिकूलतेचि कारणीमीमांसा समजण्यास अवघड आणि सूक्ष्म असते. तर द्विअंगी प्रतिकूलता विध्वंसक असली तरी तिची करणे स्पष्ट असतात .

 एकांगी प्रतिकूलतेचा गाभा वैयक्तिक स्वार्थ असतो. तर तर द्विअंगी प्रतिकूलतेचा गाभा राष्ट्रीय स्वार्थ असतो. स्वार्थ हा  एकांगी आणि  द्विअंगी प्रतिकूलतेचा गाभा आहे. तर प्रतिकूलतेचा गाभा ताठरपणा आहे. 

Thursday 6 March 2014

हम लोग-तुम लोग

काल जेव्हा अरविंद केजरीवाल यांना गुजरात पोलिसांनी अटक केली तेव्हा दिल्ली आणि लखनौ मध्ये 'भाजप' आणि 'आप' मध्ये जे काही हिंसक पडसाद उमटले ते  फारच खेदजनक आणि एकूण भारतीय राजनीती बाबत अंतर्मुख करणारे होते.

भारतासारख्या सहिष्णू म्हणवणारया देशात जेव्हा वेग-वेगळ्या पक्षांचा झेंडा मिरवणारे आपलेच देश बांधव एकमेकांची टाळकी फोडू लागले, तेंव्हा तो ' हम लोग-तुम लोगचा'  मुखवटया आडचा पुरातन चेहरा पुन्हा समोर आला.

त्यावेळी तुझा धर्म माझा धर्म यावर कत्तल उडायची. आता त्याची जागा पक्षांनी घेतलीये, पण दोन्ही वेळचा एक समान धागा कोणाच्या लक्षात येतोय कि नाही कुणास ठाऊक. मरायचे ते सैनिक आणि मरतायत ते कार्यकर्तेच...

केजरीवाल यांच्याकडून आचारसंहितेचा भंग झाला म्हंणून त्यांना अटक झाली, तर त्यासाठी आप कार्यकर्त्यांनी शांततेने का होईना  भाजप कार्यालयासमोर निदर्शने करण्याची गरज नव्हती. त्यामुळे एका शुल्लक गोष्टीला राजकीय रंग चढला.

तसेच भाजप कार्यकर्त्यांनीही  एव्हढी हिंसक प्रतिक्रिया देण्याची गरज नव्हती. शेवटी मारणारे हि आपलेच आणि मरणारेही आपलेच. निवडणुका येतील आणि जातील पण अशा घटनांनी 'हम लोग-तुम लोग' चा एकदा गेलेला विस्तव कधी विझेल का?

म्हणून  कार्यकर्त्यांनो अंतर्मुख व्हा. कोणी आदेश देत म्हणून सद्सदविवेक बुद्धी गहाण टाकून सुसाट कोणाच्याही अंगावर धावू नका. आपण लोकशाहीसाठी निवडणुका घेतोय राजेशाहीसाठी नाही हे विसरू नका. शेवटी काय मरणारे हि आपण आणि.....

Wednesday 5 March 2014

अस्तित्व

दहावीत असताना मी शेवटच्या बेंच वर बसायचो. तिथे तास सुरु असताना फार बर वाटायच कारण वहीच्या मागच्या पानावर चित्र काढायला किंवा स्वप्नात दंग व्हायला सगळ्यात उत्तम जागा असायची ती.

असच इंग्रजी च्या लेक्चर ला खरडलेली हि कविता... त्यानंतर हि बऱ्याच लिहिल्या, तरी हिची गोष्टच वेगळी कारण ती सहज घडली बनवली नाही. 

अस्तित्व

देव आहे जणू हवा 

देव आहे जणू मन 

नाही कोणा त्याची जाण 

परि गाती गुणगान 

नाही माहित त्याचा ठावा 

परि वाटे त्याचा हेवा 

अस्तित्वात असुनिया 

नाही त्यास मूर्त स्वरूप 

-विशाल बर्गे (२००२-२००३)

Tuesday 4 March 2014

गाव

कधी आपल्याला बोअर झाल कि पुन्हा ताजतवान होण्यासाठी गावा शिवाय दुसरी जागा सहसा डोक्यात येत नाही. सातारयाला गेल्यावर सुद्धा असच नेहमी ताजतवान वाटत. शहरातले रुक्ष चेहरे तिथे अपोआप बोलू लागतात... श्वास घोटुन टाकणारी हवा तिथे पुन्हा जीवन देते....

गर्दी तशी इथेहि आहे आणि तिथेहि, फरक फक्त इतकाच कि तिथली गर्दी उत्सव साजरा करते. समोरचा अनोळखी चेहरा सुद्धा तुमच्याकडे पाहून स्मित करतो जणू अप्रत्यक्षपणे तुम्हाला सांगत असतो 'या तुमच स्वागत आहे'

काम करून काळवंडलेले चेहरे सुद्धा तिथे उजळ वाटतात आणि त्यांच्या समोर मेक अप आडचे चेहरे काळवंडलेले.तिथे गरीबाच्या पुढ्यात चिल्लर टाकून त्याची भूक चाळवली जात नाही तर भाकरीच्या तुकड्याने शांत केली जाते.

गावाकडे अस बरच काही शिकण्यासारख आहे.... नशीब माझ मलासुद्धा एक गाव आहे......