Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Sunday 24 December 2017

स्वार्थ

'तर स्वार्थ म्हणजे स्वतःचे हित पाहणे आणि परमार्थ म्हणजे दुसऱ्याचे हित पाहणे'
रमेश त्याच्या आवडत्या वर्ग शिक्षकाचे म्हणणं अगदी लक्षपूर्वक ऐकत होता.
'हा! तर स्वार्थ म्हणजे स्वतःचे हित पाहणे व परमार्थ म्हणजे दुसऱ्याचे!' सरांचे वाक्य रमेशच्या मनात रुंजी घालत होते.कुमारवयीन रमेश आजपर्यंत घेतलेल्या अनुभवांचा वरील वाक्याशी ताळेबंद करु पहात हॊता.
बसल्या जागी त्याच्या मनात एक विचार आला
'स्वार्थ आणि परमार्थ या दोन गोष्टी एव्हढ्या साध्या का आहेत?स्वार्थी विचार आल्याशिवाय माणूस पुढे कसा जाईल? आणि परमार्थ करायचा म्हणजे दुसऱ्यांच्या हिताचा विचार प्रथम करायला हवा , बाप रे!'
रमेशचं मन द्विधा अवस्थेत होतं,एव्हढ्यात त्याला आईची हाक ऐकू आली.
'रमेश, ऐ रमेश, एव्हढं एक काम करतो का रे?'
'काय?' रमेश जरा वैतागूणच म्हणाला
'दुकानातून जरा किराणाचं सामान आणशील का?'
'हे काय? जरा कुठे निवांत बसलो की काम! वैताग नुसता' त्याच्या मनात विचार आला.
तो आईला रागातच म्हणाला
'मी नाही जाणार'
आता आईने आपला आज्ञाधारी सूर थोडा मवाळ केला तिला चांगल्या प्रकारे माहित होतं  की रमेश कडून हे काम कसं करून घ्यायचं ते,
'असं काय करतोस रे बाळा! जा ना, हवं तर उरलेले पैसे तुलाच ठेव!'
आईचं हे वाक्य कानी येताच रमेश खुश झाला जसं काही तो याचं गोष्टीची वाट पहात होता.तो लगेच दुकानात जायला तयार झाला.
दुकानात जात असताना त्याच्या मनाने मघाशी सार्थ चिंतनपर तुटलेला दुवा लगेच सांधला. त्याच्या मनात पुन्हा स्वार्थ आणि परमार्थाचे विचार येऊ लागले.
'अरे मी एव्हढा स्वार्थ आणि परमार्थाचा विचार करतोय खरा पण आईचं एक छोटंसं करण्यासाठी मी उरलेले पैसे स्वतःकडे ठेवण्याची लाच स्वीकारली, म्हणजे माझी ही कृती सुद्धा स्वार्थीच नाही का?'
रमेशला त्याच्या या कृतीचं वाईट वाटलं.
दुसऱ्या दिवशी रमेश त्याचा मित्र विनू कडे गेला,नाहीतरी सुट्टीत घरी बसून त्याला कंटाळाच यायचा.विनूकडे गेल्यावर त्याच्याकडे कॉम्प्युटर गेम्स खेळून त्याचा तेवढाच विरंगुळा व्हायचा.
बाहेर दिवाणखान्यात विनूचे वडील कोणाशीतरी बोलत हॊते, म्हणून विनू त्याला आतल्या खोलीत घेऊन गेला.बाहेरच्या खोलीतून आवाज येत होता,
'एव्हढं आमच्या नव्या फॅक्टरीसाठी कर्ज मंजूर करून द्या'
'ठीक आहे मी सांगितलेली कागदपत्रे तयार आहेत ना?'
'हो'
'मग ती मला द्या'
'या वेळी तरी होईल ना काम?आता जवळ जवळ एक महिना होत आला.'
'अहो मला मान्य आहे, पण बँकेतून कर्ज मंजूर करून घेणं एव्हढं का सोपं आहे'
'बरं प्रयत्न तरी करा'
'हो तर, तुम्ही काळजी करू नका.आणि हो जरा वरचे पैसे लागतील.'
'ठीक आहे,देईन'
'बरं मग येतो मी'
एजंट होता वाटतं, कर्ज मंजुरीसाठी केव्हढा हा खटाटोप आणि पैशांची काय भानगड?त्याचा मनात विचार येऊन गेले.
विनूकडून घरी आल्यावर त्याने सहज म्हणून पेपर चाळायला घेतला. एका पानावर ठळक अक्षरात बातमी होती,
पत्रकार जुडीथ मिलर ला अटक
पूर्ण बातमी वाचल्यावर समजलं की या पत्रकार महिलेने विद्यमान अध्यक्षांच्या विरुद्ध बातमी देणाऱ्या एका व्यक्तीचे नाव उघड करण्यास नकार दिला त्यामुळे तिला अमेरिकी न्यायालयाने अटक केली होती.
'अरे ही तर हुकूमशाही आहे, हे बरोबर नाही.आणि हा तर चक्क सरकारी स्वार्थ!'
विनूच्या मनात पुन्हा विचारांच काहूर माजलं
इथून तिथून कुठेही जा स्वार्थ सगळीकडेच आहे, तो त्याचा असो वा माझा,छोटा असो वा मोठा...
आणि हो आता मी या स्वार्थाख्यानाचा शेवट माझे नाव लिहून मी माझा स्वार्थ पूर्ण करतो.

                                     - विशाल बळवंत बर्गे

No comments:

Post a Comment