Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Saturday 30 December 2017

तो एक सेकंद....

मागे काही दिवसांपूर्वी सहज म्हणून मामा मामी कडे गेलो. बरेच दिवस त्यांच्याकडे जाणं झालं नव्हतं, म्हणून आवर्जून त्यांच्याकडे गेलो.नेहमीप्रमाणे चहा पाण्याचे सोपस्कार पार पडल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पांना सुरुवात झाली.
मामी सांगत होत्या, गणपतीच्या वेळी त्यांचा मुलगा कसा डेंगीने आजारी पडला आणि तो बरा होतोय तोवर त्याही आजारी पडल्या आणि त्यांच्या नेहमीच्या दिनचर्येत कसा परिणाम झाला ते. विषयाचा ओघ आजकाल कुणाला काय होईल आणि काय नाही याचा नेम नाही असाच होता.सगळं काही अशाश्वत. माणूस आज आहे तर उद्या नाही असे सांगत मामानी काही किस्सेही सांगितले.विषयाचा ओघ पाहून मी ही मामांच्या म्हणण्याला दुजोरा देत पुस्ती जोडली की , जगात दर सेकंदाला दोन व्यक्ती मरतात आणि त्याच सेकंदात चारजण जन्माला ही येतात.या काहीशा सकारात्मक आणि सत्य परिस्थितीवर एकमत होऊन तो विषय आम्ही तिथे संपवला.
आज जेव्हा मी कधी तो संवाद आठवून घडयाळाकडे पाहतो तेव्हा मी काहीसा अंतर्मुख होतो.घड्याळातील ते दोन मोठे काटे प्रत्येक आकड्यावर विसावा घेत जात असताना एक बारीकसा सेकंद काटा मात्र कुठल्याही आकड्याशी बांधील न राहता सरसर पुढे सरकत असतो.दुनिया जरी मिनिट आणि तासांच्या परिभाषेत जगत असली तरी तो सेकंद काटा जाणीव करून देतो की त्यांचं मोजमाप त्याच्या शिवाय करणं अशक्य आहे.तो सेकंद काटा जाणीव करून देतो जगातील अशाश्वत गोष्टींची ज्या आज आहेत त्या उद्या नक्कीच नसणार,न जाणो आपल्या कळत नकळत जगात त्या प्रत्येक सेकंदाला किती लोक अनंतात विलीन होत असतील आणि किती जन्माला येत असतील.त्यात आपलाही एखादा सेकंद येईल त्या मृत्यू पावणाऱ्या दोन आकड्यात भर घालायला.
म्हणूनच कदाचित सेकंद काटा कुठल्याही आकड्याशी बांधील नसावा तो आपला सरकत असतो कुठेही विसावा न घेता. तो एक जसा अनाहूत सल्लाच आहे आपल्यासाठी की कुठल्याही व्यक्ती आणि परिस्थितीत बांधील न राहता पुढे जाण्याचा.जे आज आहे ते उद्या नसणार हे जर सत्य आहे तर आजच्या दुःखासाठी रडत का बसा आणि आज जे सुख वाटतंय त्याचा माज तरी का करावा.आपण फक्त पुढे जावं जीवनाच्या प्रत्येक क्षणात समरस होऊन.विशिष्ट गोष्टींची वाट पाहून उत्सव साजरा करण्यापेक्षा जीवनच उत्सव केला तर काय वाईट.
शेवटी आपलाही एक सेकंद येणार आहे आणखी चार जनातील एकाला जागा करून द्यायला.

(प्रिय वाचक, नवीन वर्षाच्या तुम्हांला खूप साऱ्या शुभेच्छा.प्रत्येक क्षण नवीन आहे फक्त त्याचं आवर्तन पूर्ण झाल्यावर आपण ते नूतन वर्ष म्हणून साजरं करतो.साजरं फक्त नवीन वर्ष करू नका प्रत्येक क्षण साजरा करा.)

                      ।।शुभम भवतु।।

                                   - विशाल बळवंत बर्गे

No comments:

Post a Comment