Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Saturday 6 January 2018

दंगल घडण्यामागची तात्विक मीमांसा

वैश्विकदृष्ट्या पाहायला गेलं तर माणूस हा एक प्राणी आहे. माणूस इतर प्राण्यांपासून यासाठी वेगळा आहे कारण त्याला बुद्धी आहे पण माणूस आणि प्राण्यांमध्ये एक समान दुवा आहे तो म्हणजे भावना.
माणूस वैयक्तिक स्तरावर वैचारिक अथवा बुद्धिशील असतो परंतु संयुक्तरित्या तो भावनाशील उरतो.याचं कारण बहुदा इतरांच्या विचारांशी आपले विचार तो अवलोकन करतो परंतु इतरांचे विचार आपल्या विचारांना धक्का देणारे ठरू लागले तर त्याच्या दोन प्रतिक्रिया निर्माण होतात.एक तर तो इतरांचे विचार धिक्कारतो कारण त्याचा अहंम दुखावतो
दुसरी गोष्ट म्हणजे तो दुसऱ्यांचे विचार स्वीकारून त्यात त्यांना सामील होतो, कारण त्याची स्वतःची विचारांची अस्पष्टता आणि बौद्धिकदृष्ट्या इतरांचे विचार आपल्या विचाराहून योग्य वाटणे.
आता हे मुद्दे विस्ताराने सांगायचे तर, एक असं अवलोकन आहे की बहुतकरून मोठमोठ्या सभांमध्ये होणाऱ्या वक्तव्यांमध्ये समविचारी किंवा समधर्मी समाज एकत्र होतो, त्यांना एकतर वक्त्याच्या विषयामध्ये रुची असते किंवा त्याचे विचार जाणून घेण्यास ते उत्सुक असतात, तर दुसऱ्या प्रकारचे लोक असे असतात जे आधीपासून वक्त्याच्या विषयवस्तुस परिचित असतात आणि त्याचे समर्थन करणारे सुद्धा.
आता उपरोक्त समुदायात लोकांचा रोख वक्त्याच्या 'बुद्धिवादाकडे' (तो त्याच्याकडे असो अथवा नसो) केंद्रित झाल्याने त्यांची वैयक्तिक बुद्धी ही वक्त्याला शरण जाते आणि भावनेला मोकळी जागा मिळते आणि तिथे तिचे बुद्धीशी द्वंद्व होत नाही. एकदा का लोकांची भावना जागृत झाली की वक्त्याचे काम फक्त त्यांच्या भावनेशी खेळण्याचे उरते (तसा वक्त्याचा हेतू असो अथवा नसो) म्हणून बहुतकरून मोठ्मोठ्या सभांमध्ये होणाऱ्या भडकावू भाषणानंतर समाज चेततो किंवा दंगलीस प्रवृत्त होतो. भारतात विशेषकरून उत्सव आणि सभांमध्ये नियंत्रण ठेवावे लागते, कारण अशा ठिकाणी बुद्धी शरण जाते परंतु भावना चंचल असतात त्यामुळे त्या शरण जात नाहीत.बुद्धी जेव्हा शरण जाते तेव्हा श्रद्धा निर्माण होते जी कोणत्याही सिद्धांत,मत,विचार किंवा धर्माबद्दल असू शकते.श्रद्धेतून निर्माण होते धारणा, धारणेतून निर्माण होतात विचार आणि विचारातून निर्माण होते कृती. म्हणून कोणताही नवीन विषय किंवा विचार जाणून घेण्याआधी धारणा किंवा पूर्वग्रहांना तिलांजली देणं आवश्यक आहे.

                                          - विशाल बळवंत बर्गे

No comments:

Post a Comment