Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Saturday 28 December 2019

न भूतो...निर्मिती प्रवास आणि आभार प्रदर्शन

न भूतो...निर्मिती प्रवास आणि आभार प्रदर्शन

व्यंगचित्र मालिका, प्रत्येकाच्या आवडीचा नसला तरी प्रत्येकाकडून एका हलक्या मनोरंजनात्मक दृष्टिकोनातून पाहिला गेलेला विषय. तसा व्यंगचित्रे आणि माझा दूरवर ही काही संबंध नव्हता पण व्यंगचित्रांच्या माध्यमातून देण्यात येणारा कोणताही संदेश ज्या प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचतो तसा तो शब्द सौंदर्याने काठोकाठ ओथंबलेल्या दीर्घ काव्य अथवा निबंधातून तो जन सामान्यांपर्यंत पोहचेल याची काही शाश्वती नाही आणि याची प्रचिती वेळोवेळी आपण घेत आलो आहोत.

व्यंगचित्रांची ताकद पारखण्यासाठी सर्वोत्तम उदाहरण म्हणजे स्व. बाळ ठाकरे यांचं मार्मिक च्या अंकातून तेव्हाच्या राजकीय परिस्थितीवर केलेलं टीकात्मक परंतु मनोरंजनात्मक शरसंधान जे लोकांच्या काळजाला भिडल, आज परिस्तिथी बदलली आहे लोकांचे प्रश्न बदलले आहेत आणि ओघाने मनोरंजनाची व्याख्याही, परंतु व्यंगचित्रे आजही जिवंत आहेत परिस्थितीनुरूप स्वतःला बदलत. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर यांची ' चिंटू ' ही दिर्घ व्यंगचित्र मालिका हे त्याचं जिवंत उदाहरण.

असो, व्यंगचित्रांचा महिमा सांगण्याचा उद्देश हाच की ही एक स्वतंत्र कला आहे ज्या मध्ये कलाकाराच्या शब्द चातूर्या बरोबरच चित्र कलेचा ही कसं लागतो.

प्रवास
' न भूतो ' या व्यंगचित्र मालिकेच्या निर्मितीचा आणि माझ्या या पहिल्या प्रयासाचा प्रवास ओघाने झाला म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. मला चित्र काढण्याची हौस आहे आणि त्यामुळे मी माझ्या कॉलेज च्या दिवसांमध्ये या कलेला पूरक अशा animation कोर्स ला एडमिशन घेतली होती (द्वी मितीय आणि त्रि मितिय ) परंतु तो एक अर्ध वेळ कोर्स होता आणि माझा व्यावसायिक किंवा पूर्ण वेळ मी कॉमर्स शाखेला दिला होता. काळ परत्वे मी दोन्ही बाजूंचे अभ्यासक्रम पूर्ण केले आणि अर्थार्जन म्हणून पूर्णवेळ अभ्यासक्रमास न्याय सुसंगत असं क्षेत्र निवडलं, परंतु मनातून कले प्रतीचा ओढा कायम होता. त्याच वेळी मला एका व्यावसायिक वेब साईट करता व्यंग चित्र मालिका तयार करण्याचा प्रस्ताव आला परंतु मी त्यावेळी स्वतः बद्दल साशंक होतो आणि मला कोणालाही बांधील राहून काम करण्यात रस नव्हता. म्हणून त्यावेळी मी तो प्रस्ताव नाकारला परंतु व्यंगचित्र मालिकेच्या निर्मितीचे बीज त्या क्षणी माझ्या मनात कायमचं पेरल गेलं. आणि हाच तो क्षण होता ज्यावेळी मी ठरवलं व्यंगचित्र मालिका निर्मितीबाबत.

बीज
या पूर्वी मराठी मध्ये ज्या काही व्यंगचित्र मालिका निर्मित झाल्या त्या निव्वळ मनोरंजन हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन सामजिक परिस्थितीला संयुक्तिक आणि समांतर अशा होत्या. ज्यात तुमच्या आमच्या सारखी माणसे केंद्रबिंदू होती. मला ही चौकट मोडायची होती. मला असं जग निर्माण करायचं होत जे आपल्या समाजा सोबत सुसंगत तर असेल परंतु ते जग पूर्णतः वेगळं असेल आणि विचार करता मला आपल्या समाजा चा हिस्सा नसला तरी प्रत्येक आबाल वृद्धांच्या जिव्हाळ्याचा तरी अनाकलनीय गूढ आणि भीतीदायक प्रकारचा दुआ सापडला आणि तो म्हणजे ' भूत '

कथा निर्मिती
संकल्पना तर सुचली होती परंतु त्या संकल्पनेला सुसंगत कथाबिज निर्मिती आणि त्यानंतर पात्र निर्मिती हे खरे आव्हान होते. सुरुवात केली कथा निर्मितीपासून आणि सलग कथे ऐवजी छोट्या छोट्या भागातून विनोदी अंगाने परंतु कधी सामाजिक विषयाला हात घालत तर कधी उपहासात्मक तर कधी फक्त निव्वळ मनोरंजन हा हेतू समोर ठेऊन विविध भाग लिहीत गेलो आणि बघता बघता माझे ६० भाग लिहून झाले

पात्र निर्मिती
या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात अवघड भाग म्हणजे पात्र निर्मिती कारण याआधी भूत म्हणजे सरधोपट साचात झालेलं त्यांच प्रस्तुतीकरण आणि लोकांच्या मनात असलेली त्यांची पूर्व विकसित छबी जी परदेशस्थ कलाकारांनी निर्माण केली होती मला त्यातून बाहेर पडून पूर्णपणे वेगळी आणि भारतीय बनावटीची पात्र निर्मिती करायची होती. आपल्या लोक कथांमधून प्रसिद्ध असलेली चरित्र या व्यंगचित्र मालिकेसाठी निर्माण करण्याचे मी ठरवले आणि दंतकथा व मंदिरे आणि गाव वेशीवरील प्रतीकात्मक चिन्हे या गोष्टीतून प्रेरणा घेऊन त्यांची निर्मिती केली परंतु त्यांचे भीतीदायक रूप पालटून त्यांचे व्यंगाच्या  दृष्टिकोनातून चित्रीकरण केले आणि काही चारित्रांना मानवी पेहराव ही दिले

सजावट आणि सहयोग
लेखन आणि पात्र निर्मिती झाल्यावर लोकांसमोर त्यांचे योग्य प्रस्तुतीकरन होणे ही तेव्हढेच आवश्यक होते आणि त्यासाठी मला निव्वळ शब्दाखातर सहयोग केला माझा भाचा आणि तरुण सजावटकार आकाश देशमुख याने त्याचे आभार मानणे कदाचित संयुक्तिक ठरणार नाही कारण तो या छोट्या प्रवासात माझा सहकारी होता. त्यासाठी त्याला एक छोटं वाक्य ' Thank You '

आभार
मी ' न भूतो ' ही व्यंगचित्र मालिका सोशल मीडियावर प्रस्तुत करण्यापूर्वी काहीसा साशंक होतो कारण त्या आधी ही मालिका वर्तमानपत्रात प्रसिद्ध व्हावी म्हणून मी प्रयत्नशील होतो, परंतु त्यात यश लाभले नाही आणि ' मन का हो तो अच्छा ओर ना हो तो ओर भी अच्छा ' या उक्ती प्रमाणे दुसऱ्या आणि सहज लोकप्रवण अशा माध्यमाचा म्हणजे सोशल मिडीयाचा वापर करण्याचं मी ठरवलं.
तत्पूर्वी मी चिंटू कार चारुहास पंडित यांची भेट घेतली आणि त्यांनी ही मला त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन माझ्या संकल्पनेला समर्थन देत ' न भूतो ' च्या प्रसिद्धीस प्रोत्साहित केले. तसेच मराठी जगतातील महान आणि दैवी देणगी लाभलेले व्यंगचित्रकार शि.द.फडणीस यांना भेटण्याचा योग ही याच काळात आला आणि त्यांनी मला ' न भूतो ' च्या हस्तलिखित प्रतीवर स्वाक्षरी देऊन शुभाशीर्वाद दिले. या दोन महनिय व्यक्तींचे आभार मानावे तेवढे कमीच मी त्यांचा शतश: आभारी आहे

रसिक वाचकांसाठी..
कोणत्याही कलेच यश त्याच्या रसिकांच्या पाठिंब्याशिवाय अशक्य असतं , इथे समर्थनार्थ आकडा महत्वाचा नसतो तर जे काही रसिक लाभले असतील त्यांच प्रेम आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य महत्वाचं असते. मी ' न भूतो ' या व्यंगचित्र मालिकेच्या सर्व रसिकांचे मन: पूर्वक आभार मानतो आणि आपले प्रेम असेच कायम राहो अशी प्रार्थना करतो.

धन्यवाद

                                               - विशाल बळवंत बर्गे
                                                 (संकल्पना आणि चित्रकार - ' न भूतो ')

संकेतस्थळ -  http://vbargedp.blogspot.in/


No comments:

Post a Comment